इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 इतिहास 8

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वराचे मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली.
2मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसविली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांस वस्ती करण्यास मुभा दिली.
3पुढे शलमोनाने, हमाथ-सोबा हे नगर जिंकून घेतले.
4वाळवंटातील तदमोर, हे नगरही त्याने वसवले कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथामधली नगरे बांधली.
5वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ होरोन यांचीही उभारणीही शलमोनाने केली ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करून,
6बालाथ नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरूशलेम, लबानोन व आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.
7इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले.
8हे लोक मूळचे इस्राएल नव्हते या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत.
9इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते.
10काही इस्राएली लोक तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी अडीचशे होते.
11शलमोनाने फारोच्या कन्येला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्याठिकाणी परमेश्वराचा करार कोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत, तेव्हा माझ्या पत्नीने इस्राएलचा दावीद याच्या नगरात राहू नेये.”
12मग शलमोनाने वेदीवर परमेश्वरास होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.
13मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी शब्बाथाच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपाचा सण हे तीन वार्षिक सण होत.
14आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या.
15याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यामध्ये इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही.
16शलमोनाची सगळी कामे सिध्दीस गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने परमेश्वराच्या मंदिराचे काम पूर्ण झाले, व ते उपयोगात आणले जाऊ लागले.
17यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एसयोन-गेबेर आणि एलोथ या नगरांत गेला.
18हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर, हे सेवक ओफिर येथे गेले, आणि तेथून चारशे पन्नास किक्कार सोने आणून, त्यांनी ते शलमोनाला दिले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.