इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 इतिहास 7

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरुन गेले.
2त्या तेजाने दिपलेल्या याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना.
3सरळ स्वर्गातून अग्नी खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलाच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वरास धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, “परमेश्वर चांगला आहे त्याची कृपा सर्वकाळ राहते.”
4शलमोनाने आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे यज्ञ केले.
5राजा शलमोनाने बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे यांचा यज्ञ केला. अशा प्रकारे लोकांनी व राजाने देवाच्या घरा साठी समर्पण केले.
6याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवीही उभे राहिले. राजा दाविदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करून घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा सनातन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवीच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.
7परमेश्वराच्या मंदिरासमोरचे मधले दालन शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना म्हणून मधले दालन त्याने वापरले.
8शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साजरा केला. हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता.
9आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साजरा केला होता व समर्पणे सात दिवस वेदीवर ठेवली होती, ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. सात दिवस त्यांनी सण साजरा केला.
10सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी शलमोनाने लोकांस घरोघरी परतायला सांगितले. दावीद, शलमोन आणि इस्राएल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंत:करणे आनंदाने भरुन गेली होती.
11परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या.
12नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, “शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे.
13कधी जर पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा माझ्या लोकांमध्ये रोगाराईचा प्रसार केला
14आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला उत्तर देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन.
15आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत.
16हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे माझे नाव येथे सदासर्वकाळ रहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल.
17शलमोना, तुझे पिता दावीद यांच्या प्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस,
18तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे पिता दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हटले होते, ‘दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलाच्या राजपदावर आरुढ होईल.’
19पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस,
20तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएल लोकांस मी हुसकावून लावीन. माझ्या नावाप्रीत्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर त्यांना मी देशामध्ये निंदेचा विषय करीन.
21एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता आश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, ‘हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे?’
22तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, ‘कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांस या परमेश्वरानेच मिसरातून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली. त्यांनी मूर्तीपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.’ ”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.