इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 इतिहास 9

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली तेव्हा त्याची कठीण परीक्षा घेण्यासाठी ती यरूशलेमास आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने सोबत आणल्या होत्या शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी मनातल्या गोष्टी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते.
2शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यास त्यातले काहीच अवघड वाटले नाही. त्याने उत्तर दिले नाही असा कोणताच प्रश्न उरला नाही.
3शबाच्या राणीने त्याच्या सूज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला.
4त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्याची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे प्यालेबरदार आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिली आणि या दर्शनाने ती थक्क झाली.
5मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत.
6इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. आता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहीले आहे. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस.
7तुझे लोक व तुझ्या सेवेत सदैव तत्पर असलेले तुझे सेवक, तुझी माणसे आणि अधिकारी फार धन्य आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो.
8तुझा देव परमेश्वर ह्याची स्तुती असो. तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे. परमेश्वराचे इस्राएलावर प्रेम आहे आणि इस्राएलावर त्याचा कायमचा वरदहस्त आहे जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे.”
9शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला एकशेवीस किक्कार सोने, अनेक मसाल्यांचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्यांचे पदार्थ व वस्तू शलमोनाला कधीच कोणाकडून मिळाले नव्हते.
10हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिर येथून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली.
11परमेश्वराच्या मंदिराच्या आणि राजमहालाच्या पायऱ्या तसेच गायकांच्या वीणा व सतारी यासाठी शलमोनाने हे रक्तचंदन वापरले. रक्तचंदनाचा वापर करून बनवलेल्या इतक्या सुंदर वस्तू यापूर्वी यहूदात कधी कोणी पाहिल्या नव्हत्या.
12शबाच्या राणीला जे हवे ते राजा शलमोनाने देऊ केले. त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासाहित आपल्या देशात परतली.
13शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन सहाशे सहासष्ट किक्कार एवढे असे.
14याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने चांदी आणत, ते वेगळेच
15सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशा प्रत्येक ढालीला सहाशे शेकेल वजनाचा सोन्याचा पत्रा लागला.
16याखेरीज अशा घडीव सोन्याच्या तीनशे ढाली त्याने केल्या. त्यांना प्रत्येकी तिनशे शेकले सोने लागले. या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनाच्या अरण्यमहालात ठेवल्या.
17राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन बनवले व सिंहासनाच्या वरचा भाग मागे गोलाकार होता. ते शुद्ध सोन्याने मढवले.
18या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. बैठकीच्या दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्यास लागून प्रत्येकी एक सिंहाचा पुतळा होता.
19सहा पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एकेक असे एकंदर बारा सिंह होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते.
20राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती लबानोनाच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुद्ध सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे.
21राजाकडे समुद्रांवर गलबतांचा ताफा हिरामाच्या ताफ्यासोबत होता. तीन वर्षातून एकदा हा ताफा सोने, चांदी व हस्तीदंत ह्याप्रमाणे मोर व वानरे आणत.
22वैभव आणि ज्ञान याबाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला.
23त्याच्या सल्लामसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सूज्ञपणा दिला होता तो पहावयास ते येत असत.
24हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यामध्ये सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे.
25घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे चार हजार बस्थाने होती. त्याच्यापदरी बारा हजार स्वार होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वत:ला लागतील तेवढ्याची यरूशलेमामध्ये केली होती.
26फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजावर शलमोनाचा अधिकार होता.
27यरूशलेमचा राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरूची झाडे, खोऱ्यातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती.
28मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.
29शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या सर्व गोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यावादयाच्या इद्दोची दर्शने यामध्ये नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा पुत्र यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे.
30शलमोनाने यरूशलेमेत इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.
31मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीद नगरात दफन केले. शलमोनाचा पुत्र रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.