इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

प्रकटीकरण 6

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले आणि त्या चार प्राण्यातील एकाने मेघगर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणताना ऐकले.
2मी एक पांढरा घोडा पाहिला, त्यावर जो बसला होता त्याच्याजवळ धनुष्य होते आणि त्यास मुकुट देण्यात आला. तो जिंकीत विजयावर विजय मिळविण्यास निघाला.
3जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा दुसऱ्या जिवंत प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले.
4नंतर दुसरा घोडा निघाला, तो अग्निज्वालेप्रमाणे लाल होता. त्यावर जो बसलेला होता त्यास पृथ्वीवरील शांती नाहीशी करण्याचा अधिकार दिला होता. यासाठी की, लोकांनी एकमेकास वधावे. त्यास मोठी तलवार देण्यात आली होती.
5जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तिसऱ्या जिवंत प्राण्याला “ये” असे म्हणतांना ऐकले तेव्हा मी काळा घोडा पाहिला आणि त्यावर जो बसलेला होता त्याच्या हातात तराजू होते.
6मी चार प्राण्यांच्यामधून निघालेली वाणी ऐकली, ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला तीन शेर जव. परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस.
7कोकऱ्याने जेव्हा चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याची वाणी “ये” म्हणताना ऐकली.
8नंतर मी फिकट रंगाचा घोडा पाहिला. त्यावर जो बसलेला होता त्याचे नाव मरण होते; आणि मृतलोक त्याच्या पाठीमागून त्याच्याबरोबर चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळाने, रोगाने व पृथ्वीवरील श्वापदांकडून मनुष्यांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला होता.
9जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते.
10ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे “स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस?”
11तेव्हा त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्यापूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विसावा घ्या.
12त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला;
13अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले
14एखाद्या गुंडाळीसारखे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरून ढळून गेली.
15पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे, गुहात व डोगरांतील खडकातून लपली;
16आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा,
17कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि त्याच्यापुढे कोण टिकेल?
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.