इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

प्रकटीकरण 5

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग मी, जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती.
2आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?”
3परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यांत पाहावयास समर्थ नव्हता.
4ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले.
5परंतु वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”
6राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी कोकरा उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते.
7तो गेला आणि त्याने जो, राजासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
8आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या.
9आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत.
10तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.”
11मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती.
12देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले. जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे.
13प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!”
14चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.