इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

गणना 14

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले.
2इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली “आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मरण पावलो असतो तर बरे झाले असते.
3तलवारीने आमचा नाश व्हावा म्हणून या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हास इथे आणले का? शत्रू आम्हास मारून टाकील आणि आमच्या स्त्रिया मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
4नंतर ते एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
5तिथे जमलेल्या सर्व इस्राएलांच्या मंडळीसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
6नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब, जे कोणी देश तपासणीसाठी पाठवले होते त्यामधील हे दोघे होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली.
7ते इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीशी बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला येथून तेथे फिरलो तो देश खूप चांगला आहे.
8जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहणारा देश आपल्याला देईल.
9“परंतु परमेश्वराविरूद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपल्या अन्नाप्रमाणे आपण त्यांना सहज भक्ष्य करू. त्यांचे संरक्षण त्यांच्यापासून काढले जाईल, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहे. त्यांना घाबरु नका.”
10पण सर्व मंडळी म्हणू लागली त्यांना दगडमार करा. परंतु परमेश्वराचे तेज दर्शनमंडपावर इस्राएल लोकांस दिसले.
11परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक कोठवर मला तुच्छ लेखतील? ह्यांच्यामध्ये मी केलेली शक्तीशाली चिन्हे पाहूनही त्याची पर्वा न करता माझ्यावर विश्वास ठेवण्यास चुकत आहेत.
12मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.”
13मोशे परमेश्वरास म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिसरी लोक ऐकतील कारण तू आपल्या सामर्थ्याने या लोकांस बाहेर आणले.
14ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांच्या मध्ये आहेस, कारण तू परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहेस तुझा ढग त्यांच्यावरती उभा राहतो, आणि दिवसा ढगाच्या खांबात रात्री त्या ढगाचा अग्नीच्या खांबात तू त्यांच्यापुढे चालतोस.
15आता जर तू या लोकांस एका मनुष्याप्रमाणे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी किर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील,
16परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यामध्ये तो आणू शकला नाही म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले.
17“म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू, म्हणाला होतास,
18परमेश्वर रागवायला मंद आहे आणि विपुल दयेने भरलेला आहे. तो अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांची मुळीच गय करत नाही. तो पूर्वजांच्या पापाबद्दल त्यांच्या वंशजाच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीवर वडिलांच्या अन्यायाची शिक्षा लेकरांना करतो.
19मी तुला विनंती करतो, तुझ्या महान विश्वसनीयतेच्या कराराने त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही त्यांना क्षमा कर.”
20परमेश्वर म्हणाला, “तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.”
21पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे.
22ज्या सर्व लोकांनी माझे वैभव आणि मिसर देशात व रानात सामर्थ्याची चिन्हे पाहिले. तरी दहादा त्यांनी माझी परीक्षा पाहिली आणि माझी वाणी ऐकली नाही.
23मी जो देश त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला तो ते खचित पाहणार नाहीत. ज्यांनी मला तुच्छ मानले त्यांच्यापैकी तो कोणीही पाहणार नाही.
24पण माझा सेवक कालेब याच्यासोबत वेगळा आत्मा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्यास नेईल. आणि त्याच्या वंशजांना तो देश वतन होईल.
25अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात राहत आहेत. म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा.
26परमेश्वर मोशे आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
27ही दुष्ट मंडळी माझ्याविरूद्ध टिका करते त्यांचे मी किती काळ सहन करू? इस्राएली लोक माझ्याविरूद्ध तक्रार करतात त्या मी ऐकल्या आहेत.
28तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन.
29तुमची प्रेते या रानात पडतील. तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षांचा किंवा त्याहून अधिक वयाचे ज्यांनी माझ्याविरूद्ध कुरकुरले,
30ज्या देशात तुमचे घर देण्याचे वचन मी तुम्हास दिले त्यामध्ये तुमच्यापैकी कोणीही जाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा जातील.
31ज्या तुमच्या मुलाबाळाविषयी तुम्ही म्हणाला की, त्यांची लूट होईल. मी त्यांना त्या देशात नेईल. तुम्ही जो देश नाकारला तो देश ते अनुभवतील.
32आणि तुमच्याविषयी तर तुमची प्रेते या रानात पडतील.
33तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील.
34तुम्हास तुमच्या पापाबद्दल चाळीस वर्षे दु:ख भोगावे लागेल. त्या मनुष्यांना तो प्रदेश शोधायला चाळीस दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हास समजेल.
35“मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट मनुष्यांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरूद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या रानात मरतील.”
36मोशेने ज्या लोकांस नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तीवान नाहीत.
37ज्यांनी वाईट वर्तमान आणले ते पुरुष जबाबदार होते ते परमेश्वरासमोर मरीने मरण पावले.
38यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो देश शोधायला पाठवलेल्या लोकात होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले.
39मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांस सांगितल्या. लोक खूप दु:खी झाले.
40दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या देशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हास वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या देशात आम्ही जाऊ.”
41पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हास यश मिळणार नाही.
42त्या देशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.
43अमालेकी आणि कनानी लोक आहेत तुम्ही तलवारीने पडाल. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”
44परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही.
45डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मा नगरापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.