इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

गणना 13

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2“कनान देश हेरण्यासाठी काही लोकांस पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांस देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका सरदाराला पाठव.”
3तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानाच्या रानात असताना हे सरदार पाठवले. ते सर्व इस्राएलाच्या वंशातील होते.
4त्यांची नांवे अशी आहेत:रऊबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुवा.
5शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट.
6यहूदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
7इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल.
8एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा.
9बन्यामीन वंशातला राफूचा मुलगा पलटी,
10जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीयेल,
11योसेफ वंशातला (मनश्शे) सूसीचा मुलगा गद्दी,
12दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल.
13आशेर वंशातला मीकाएलाचा मुलगा सतूर,
14नफताली वंशातला बाप्सीचा मुलगा नहब्बी.
15आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल.
16मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.)
17मोशेने कनान देश हेरण्यास पाठवताना लोकांस सांगितले की तुम्ही येथून नेगेब प्रांतामधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा.
18देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या.
19ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास
20योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या. ते दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहराचे होते.
21म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन रानापासून रहोब आणि लेबो हमाथपर्यंतच्या प्रदेशात शोध घेतला.
22त्यांनी नेगेबमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते. अहीमान शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहत होते.
23नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदीला द्राक्षाचा घोसासहीत त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघेजण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळिंबे व अंजीर ही घेतली.
24त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता.
25त्या लोकांनी त्या प्रदेशाचा चाळीस दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले.
26इस्राएल लोकांची छावणी पारानाच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांस त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली.
27ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हास ज्या देशात पाठवले आणि आम्ही तेथे पोहचलो. आणि खचीत दूध व मध वाहणारा तो देश आहे आणि ही त्यातली काही फळे आहेत.
28पण तेथे राहणारे लोक खूप शक्तीशाली आहेत. शहरे खूप मोठी आणि तटबंदीची आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले.
29अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”
30मोशेजवळच्या लोकांस गप्प बसण्यास सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.”
31पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तीशाली आहेत.”
32आणि त्या मनुष्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस सांगितले की त्या प्रदेशातल्या लोकांचा पराभव करण्याइतके शक्तीशाली आपण नाहीत. ते म्हणाले, आम्ही जो प्रदेश पाहिला तो शक्तीशाली लोकांनी भरलेला आहे. ते लोक तिथे जाणाऱ्या कोणत्याही मनुष्याचा सहज पराभव करण्याइतके शक्तीमान आहेत.
33आम्ही तिथे खूप नेफीलीम म्हणजे नेफीलीम घराण्यातील अनाकाचे वंशज पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे असे होतो अशी तुलना केली आणि त्यांच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही तसेच होतो.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.