इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मत्तय 9

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1तेव्हा येशू तारवात बसून पलीकडे गेला व परत आपल्या स्वतःच्या नगरात आला.
2तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, “मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत.”
3काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे.”
4येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता?
5कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे?
6परंतु, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही जाणावे म्हणून,” मग येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा.”
7मग तो उठून आपल्या घरी गेला.
8हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले.
9मग येशू तेथून पुढे निघाला असता, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या मनुष्यास, जकात गोळा करतात त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला.
10येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले.
11जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?”
12येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे.
13मी तुम्हास सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, कारण मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
14मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपवास करतो. पण तुझे शिष्य उपवास करीत नाहीत. ते का?”
15येशूने त्यांना उत्तर दिले, “जेव्हा वर सोबत असतो तेव्हा त्याच्या वऱ्हाड्यांना दुःखी कसे राहता येईल? परंतु अशी वेळ येईल जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपवास करतील.
16कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडाला फाडते व छिद्र अधिक मोठे होते.
17तसेच कोणीही नवा द्राक्षरस जुन्या कातडी पिशवीत घालीत नाहीत, घातला तर त्या पिशव्या फुटतात व द्राक्षरस सांडतो; तर नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशव्यांत घालतात. म्हणजे दोन्हीही टिकून राहतात.”
18येशू या गोष्टी त्यांना सांगत असता यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. परंतु आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेव म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल.”
19तेव्हा येशू उठून आपल्या शिष्यांबरोबर त्याच्यामागे जाऊ लागला.
20मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली.
21कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.”
22तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
23मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले,
24तो म्हणाला, “वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्यास हसू लागले.
25मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली.
26आणि ही बातमी त्या सर्व प्रांतात पसरली.
27तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “हे दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया कर.”
28येशू त्या घरात गेला तेव्हा ते आंधळेही त्याच्याकडे त्याच्यामागे आत आले. त्याने त्यांना विचारले, “मी तुम्हास दृष्टी देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभू,” त्यांनी उत्तर दिले.
29मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.”
30आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”
31परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली.
32मग ते दोघे तेथून निघून जात असताना लोकांनी एका मुक्या, भूतबाधा झालेल्या मनुष्यास येशूकडे आणले.
33जेव्हा येशूने भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांस याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलामध्ये यापूर्वी असे घडलेले कधीही पाहण्यात आले नव्हते.”
34परंतु परूशी म्हणाले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो.”
35येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्वप्रकारचे रोग व सर्वप्रकारचे आजार बरे करत, प्रत्येक नगरातून व प्रत्येक गावातून फिरला.
36आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यास त्यांचा कळवळा आला कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.
37तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत.
38म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.