इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मत्तय 8

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्यामागे जावू लागले.
2तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात.”
3तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” आणि लगेचच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला.
4मग येशूने त्यास म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”
5मग येशू कफर्णहूम शहरात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्यास विनंती करत म्हणाला,
6“प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय आजारी होऊन घरात पडून आहे.”
7येशू त्यास म्हणाला, “मी येऊन त्यास बरे करीन.”
8तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण मा‍झ्या छपराखाली यावे अश्या योग्यतेचा मी नाही; पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.
9कारण मीही एक अधिकारी असून मा‍झ्या हाताखाली शिपाई आहेत. मी एकाला ‘जा’ म्हणले की तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हणले की तो येतो आणि माझ्या दासास ‘हे कर’ म्हणले की तो ते करतो.”
10हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांस तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, मला इस्राएलात एवढा विश्वास आढळला नाही.
11मी तुम्हास सांगतो की, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या पंक्तीस बसतील;
12परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
13मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास ठेवला तसे तुला मिळाले आहे.” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.
14नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले.
15तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; मग ती उठून त्याची सेवा करू लागली.
16मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी असंख्य दुष्ट आत्म्याने ग्रासलेल्यांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भूते केवळ शब्दाने घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले.
17“त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
18मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना गालीलच्या सरोवरापलीकडे जाण्याची आज्ञा केली.
19तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्यास म्हणाला, “गुरूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”
20येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बि‍ळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.”
21मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एकजण त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला पित्याच्या मरणापर्यंत त्याच्याजवळ राहून, त्याच्या मरणानंतर त्यास पुरून येऊ द्या.”
22येशूने त्यास म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना आपल्या मरण पावलेल्यांना पुरू दे.”
23मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्यही त्याच्यामागे चढले.
24तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता.
25तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत.
26तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले.
27तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”
28मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर त्यास दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असतांना भेटले; ते भयंकर हिंसक होते म्हणून त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते.
29तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हास पीडा द्यायला येथे आलेला आहेस काय?”
30तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता.
31मग ती दुष्ट आत्मे त्यास विनंती करू लागली की, तू जर आम्हास काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हास पाठवून दे.
32त्याने त्यास म्हटले, “जा,” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो संपुर्ण कळप कड्यावरून धडक धावत जाऊन समुद्रात पाण्यात बुडून मरण पावला.
33मग त्या डुकरांना चारणारे नगरांत पळाले आणि त्यांनी जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले.
34तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्यास सीमेबाहेर जाण्याची विनंती केली.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.