इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मत्तय 16

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परूशी आणि सदूकी लोकांस येशूची परीक्षा पाहायची होती म्हणून ते येशूकडे आले व आम्हास आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.
2परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे,
3आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हास आकाशाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत काय?
4दुष्ट व देवाशी अप्रामाणिक असणारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.
5येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले.
6तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”
7तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.”
8पण येशूने हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपसामध्ये का करता?
9तुम्हास अजून समजत नाही काय? पाच भाकारींनी पाच हजार लोकांस जेवू घातले ते आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हास आठवत नाही काय?
10तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हास आठवत नाही काय?
11मी भाकरी विषयी तुम्हास बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हास कसे समजत नाही?”
12तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.
13येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?”
14आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.”
15मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
16शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
17येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
18आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही.
19मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
20तेव्हा त्याने शिष्यांना मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका असे निक्षून सांगितले.
21तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरूशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे.
22तेव्हा पेत्राने त्यास एकाबाजूला घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभू, तुझ्यापासून हे दूर असो. असे तुला कधीही होणारच नाही!”
23परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून चालता हो, तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
24तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
25कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील.
26जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल?
27कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
28मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यातले काहीजण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.