इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

मत्तय 15

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1तेव्हा यरूशलेम शहराहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले,
2“तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”
3येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता?
4कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे.’
5पण तुम्ही म्हणता, ‘जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते, ते मी देवाला अर्पण केले आहे.’
6ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
7अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो:
8हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
9आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.”
10तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या.
11जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.”
12नंतर शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणाला कळले काय?”
13पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.
14त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
15पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा.”
16येशूने त्यांना विचारले, “तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?
17जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग शौचकूपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय?
18परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात.
19कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.
20या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात. परंतु न धुतलेल्या हाताने खाण्याने मनुष्य अशुद्ध होत नाही.”
21नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनाच्या भागात गेला.
22तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे.”
23पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”
24पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले आहे.”
25मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”
26परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.”
27ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.”
28तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “मुली, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त होवो.” आणि त्याचवेळी तिची मुलगी बरी झाली.
29नंतर येशू तेथून निघून गालीलच्या सरोवराजवळ आला व येशू डोंगरावर चढून तेथे बसला.
30मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांस आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले.
31मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.
32मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील.”
33शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”
34तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.”
35मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली.
36मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या.
37तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या.
38आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.
39मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रदेशात गेला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.