इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहोशवा 18

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता.
2तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते.
3यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या लोकांस म्हटले, “जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिला, तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती उशीर करणार आहात?”
4तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली तीन माणसे नेमा; म्हणजे मी त्यांना पाठवीन, आणि त्यांनी देशात जाऊन चोहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे, वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे.
5म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत रहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत रहावे.
6तसे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या सात वाट्यांचे वर्णन लिहा आणि ते वर्णन इकडे माझ्याजवळ आणा; मग येथे आपला देव परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.
7लेव्यांना तर तुमच्यामध्ये वाटा नाही; कारण की परमेश्वराचे याजकपण तेच त्यांचे वतन आहे; आणि गाद व रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना, यार्देनेच्या पलीकडे पूर्वेला, वतन मिळाले आहे परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना ते दिले आहे.
8तेव्हा ती माणसे तेथून निघून देशभर फिरली आणि यहोशवाने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली; तो म्हणाला, “देशात चोहोकडे फिरून त्याचे वर्णन लिहा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”
9याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली, आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या सात विभागाचे वर्णन वहीत लिहून त्यांनी शिलोतल्या छावणीत यहोशवाजवळ आणले.
10मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या; असा यहोशवाने तेथे तो देश इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या त्यांच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला.
11तेव्हा बन्यामिनाच्या वंशजांना नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठ्ठी टाकून जो वाटा मिळाला तो असा; त्यांच्या वाट्याची सीमा यहूदाचे वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली.
12म्हणजे उत्तर बाजूला त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तरेकडून वर जाऊन, पश्चिमेकडे डोंगरावरून बेथ-आवेनापर्यंत रानात निघते.
13मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटारोथ-अद्दार येथे निघते
14तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथ-होरोनाच्या समोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहूदाचे नगर आणि किर्याथ-बाल तोच किर्याथ-यारीम येथे निघते. याची पश्चिम सीमा हीच.
15दक्षिणेकडील सीमा पश्चिमेला सुरू होऊन बाजू किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नेफ्तोहा झऱ्याकडे जाते.
16मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीसमोरला डोंगर, जो रेफाईमाच्या तळवटीच्या उत्तरेला, त्याच्या काठी उतरली, आणि यबूसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एन-रोगेलास गेली.
17मग उत्तरेकडे वळून एन-शेमेशाकडे गेली, आणि अदुम्मीम येथील चढणीच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचा मुलगा बोहन याच्या खडकाकडे जाते.
18मग ती अराबा याच्या समोरल्या भागी उत्तरेला जाऊन अराबास उतरली.
19मग ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन गेली, आणि सीमेचा शेवट क्षारसमुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्देनेच्या मुखापाशी झाला; ही दक्षिण सीमा झाली.
20आणि पूर्वबाजूला त्याची सीमा यार्देन नदी झाली; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळाप्रमाणे, त्यांच्या चहुकडल्या सीमांप्रमाणे, हे होते.
21आणि बन्यामीन वंशाला त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली; यरीहो व बेथ-होग्ला व एमेक-केसीस
22आणि बेथ-अराबा व समाराइम व बेथेल;
23अव्वीम व पारा व आफ्रा;
24कफर-अम्मोनी व अफनी व गिबा; अशी बारा नगरे आणि त्यांची गावे;
25गिबोन व रामा व बैरोथ;
26मिस्पे व कफीरा व मोजा;
27रेकेम व इपैल व तरला;
28सेला, एलेफ व यबूसी म्हणजेच यरूशलेम, गिबाथ, किर्याथ; अशी चवदा नगरे, आणि त्यांची गावे; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे आहे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.