इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 30

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे. ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात, पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही, अशी ती पापाने पापाची भर घालतात.
2ते फारोकडे संरक्षण मागण्याकरिता आणि त्याच्या छायेत आश्रय घेण्याकरता मला न विचारता मिसरकडे खाली उतरून जातात.
3यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज आणि मिसरमधील आश्रय हे तुमच्या साठी मानखंडणा असे होईल.
4तुमचे अधिकारी सोअनला आणि तुमचे दूत हानेसला गेले आहेत.
5कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे साहाय्य किंवा हित करणारे नाहीत तर लाज व निंदा असे आहेत त्यांच्यामुळे ते सर्व लाजवले जातील.”
6नेगेबमधल्या प्राण्यांविषयी घोषणा संदेश: आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे, संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प, ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात.
7मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला स्वस्थ बसणारा रहाब असे नाव दिले.
8आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव, अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्षी म्हणून ते साठून राहील.
9कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले, मुले जी परमेश्वराची शिकवणूक ऐकण्यास नकार देतात.
10ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.” आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको; आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग.
11मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर, इस्राएलाच्या पवित्र देवाला आमच्यापासून दूर घेऊन जा.”
12यामुळे इस्राएलचा पवित्र असे म्हणतो, “कारण तुम्ही हा संदेश नाकारता आणि जुलूम व कपट यांवर विसंबून राहता.
13म्हणून हा अन्याय तुम्हास, जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो, ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल.
14कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही. आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरही ठेवणार नाही.”
15कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो, “तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.” पण तुम्ही इच्छुक नव्हते.
16तुम्ही म्हणता, नाही! कारण आम्ही घोड्यांवर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल. आणि आम्ही चपळ घोड्यांवर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चपळ होतील.
17एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाच जणांच्या धमकीने तुम्ही पळून जाल. पर्वताच्या शिखरावर ध्वजस्तंभासारखे किंवा डोंगरावरच्या झेंड्यासारखे तुम्ही शिल्लक उराल तोपर्यंत असे होईल.
18तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहील. तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचावला जाईल, कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे, जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादीत आहेत.
19कारण यरूशलेम येथे सियोनेत लोक राहतील आणि तू पुन्हा कधीही रडणार नाहीस. खचित तो तुझ्या रडण्याचा आवाज होताच तुझ्यावर दया करील, जेव्हा ते ऐकल, तो तुला उत्तर देईल.
20जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दु:खाचे पाणी देईल, तरी तुझे शिक्षक पुन्हा लपू शकणार नाही, तर तुझे डोळे तुझ्या शिक्षकांना पाहतील.
21जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळाल तर तुझे कान तुझ्यामागून वाणी ऐकतील, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही या मार्गात चालावे.”
22तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मूर्तीचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओतीव मूर्तीची मढवणी तुम्ही विटाळवाल. तुम्ही त्या देवांना मासिकपाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल. तुम्ही त्यांना म्हणाल, “येथून निघून जा.”
23तुम्ही जे बी भूमीत पेराल त्यासाठी पाऊस तो देईल आणि भूमीतून मुबलक अशी भाकर देईल. आणि पिके विपुल होईल. त्या दिवसात तुझी गुरे मोठ्या कुरणांमध्ये चरतील.
24आणि बैल व गाढव जे नांगरतात ते सुपाने व दांताळ्याने उफणलेल्या धान्याचे आंबवण खातील.
25आणि वधाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील. तेव्हा उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील.
26त्यावेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश जसा सात दिवसाचा प्रकाश तसा सात पट होईल. परमेश्वर त्याच्या जखमी लोकांस मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.
27पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे, त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.
28त्याचा श्वास जणूकाय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे, अशासाठी की नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना चाळावे, आणि त्याचा श्वास लोकांच्या तोंडामध्ये बहकविणारा लगाम राहील.
29जसे पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रामाणे तुमचे गीत होते. आणि जसा कोणी परमेश्वराच्या डोंगरावर इस्राएलाच्या खडकाकडे जाताना पावा वाजवत जातो तसा तुम्हास आनंद होईल.
30परमेश्वर आपला वैभवी आवाज लोकांस ऐकू जाऊ देईल आणि वारा, पाऊस व गारपीट सह क्रोधाविष्ट व अग्नी यांनी तो आपला भुज चालवील.
31परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर विखुरला जाईल. तो त्यास आपल्या काठीने मारील.
32आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्याच्यावर मारील तो, डफ व वीणा वाजत असताना होईल, आणि हात खाली वर करीत युद्धांमध्ये तो त्यांच्याशी लढेल.
33पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे, ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्याच्या चीतेसाठी विस्तव आणि खूप लाकडे असे आहे. परमेश्वराचा श्वास जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे त्यास पेटवतो.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.