इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 24

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे.
2आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकाची तशी धन्याची, जशी दासीची तशी तिच्या धनिणीशी, जशी विकत घेणाऱ्याची तशी विकणाऱ्याची, जशी उसणे देणाऱ्याची तशी उसणे घेणाऱ्याची, जशी उधार घेणाऱ्याची तशी जो त्यास उधार देतो त्याची स्थिती होईल.
3पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.
4मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे.
5पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले, आणि सार्वकालीक करार मोडला आहे.
6त्यामुळे सार्वकालिक करार शापित झाला आहे व तेथे राहणारे दोषी आढळले आहेत. त्यांना त्याचे फळ भोगावे लागत आहे; शापाचा परिणाम म्हणून पुष्कळ लोक भस्म होतील व फार थोडे उरतील.
7नवीन द्राक्षरस वाळून गेला, द्राक्षवेल सुकले आहेत, सर्व आनंदोत्सव करणारे कण्हत आहेत.
8डफांचा आनंदी आवाज आणि हर्षाने जे मौजमजा करीत ते थांबले आहेत, वीणेचा आनंद बंद केला आहे.
9ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल.
10अंदाधूंदी असलेली नगरी मोडून पडली आहे, प्रत्येक घर बंद आणि रिकामे आहे.
11द्राक्षरसामुळे चौका चौकात रडणे आहे. सर्व हर्ष अंधकारमय आहे, भूमीचा आनंद नाहीसा झाला आहे.
12नगरात ओसाडी उरली आहे, आणि दरवाज्याचा नाश झाला आहे.
13द्राक्षांचा हंगाम सपंल्यावर व जैतून वृक्ष हलविल्यावर, झाडावर जशी थोडीशी फळे उरतात तशी या देशाची अवस्था झालेली असणार तसे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे होईल.
14ते आपला आवाज उंचावतील आणि परमेश्वराचे ऐश्वर्य ओरडतील, आणि समुद्रावरून मोठ्याने आरोळी मारतील.
15यास्तव पूर्वेत परमेश्वराचे गौरव करा, आणि सागरातील द्वीपांमध्ये इस्राएलाचा देव परमेश्वर, याच्या नावाला गौरव द्या.
16पृथ्वीच्या सीमेतून आम्ही अशी गीते ऐकली आहेत की, “धार्मिकास वैभव असो.” पण मी म्हणालो, मी वाया गेलो आहे, मी दूर वाया गेलो आहे, मला हाय हाय! कारण विश्वास घातकीने विश्वासघात केला आहे, होय, विश्वास घातक्याने विश्वास घात केला आहे.
17पृथ्वीतील राहणाऱ्यांनो, भीती व खांच आणि पाश ही तुझ्यावर आहेत.
18जो भीतीच्या आवाजापासून पळेल तो खांचेत पडेल, आणि जो खांचेमधून वर निघेल तो पाशात पडेल. स्वर्गाच्या खिडक्या उघडल्या आहेत, आणि पृथ्वीचे पाये हालत आहेत.
19पृथ्वी अगदी मोडून गेली आहे, पृथ्वी फाटली आहे. पृथ्वी फार हिंसकरीतीने हलवली आहे.
20पृथ्वी एखाद्या मद्यप्यासारखी झोकांड्या खाईल, आणि एखाद्या टांगत्या बिछान्याप्रमाने झोके खाईल, तिचा अपराध तिच्यावर भारी होईल तेव्हा ती पडेल आणि पुन्हा उठणार नाही.
21त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी, आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल.
22त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील, नंतर त्यांचा न्याय केला जाईल.
23नंतर सेनाधीश परमेश्वर सीयोनातील आपला राजासनावर आरूढ होईल तेव्हा त्याच्या तेजाने चंद्र तांबूस होईल व सूर्य फिका पडेल, तो सियोन पर्वतावरून आपल्या वडिलांसमोर वैभवाने यरूशलेमेत राज्य करील.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.