इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 23

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1सोर विषयी देववाणी, तार्शीशच्या जहाजानों, आक्रोश करा कारण तुमच्या जहाजासाठी बंदर व तुमच्यासाठी घर नाही, असे कित्तीमच्या देशापासून त्यांना प्रगट करण्यात आले आहे.
2समुद्रतीरीच्या रहिवाश्यांनों, आश्चर्यचकित व्हा, तुम्ही सीदोनाचे व्यापारी, जे तुम्ही समुद्रावरून प्रवास करता, ज्यांच्या प्रतिनीधींनी तुझ्या गरजा पूरवल्या.
3आणि महान जलांवरून नाईल नदीकाठी पिकलेले सर्व पीक, समुद्रा पलीकडून आणलेले सीहोर या भागातले धान्य ते सोर याकरीता आणले; ती राष्ट्रांची बाजारपेठ होती.
4हे सीदोना लज्जीत हो, कारण समुद्र, समुद्रातील पराक्रमी, बोलला आहे, तो म्हणतो, “मी प्रसुती वेदना दिल्या नाहीत व मी प्रसवलेहि नाही, मी तरूण पुरूष वाढवले नाहीत व तरूणींना लहाण्याच्या मोठ्या केल्या नाहीत.”
5मिसर देशात हे वर्तमान कळेल तेव्हा तेथे सोर निवासिया साठी मोठा शोक केला जाईल.
6तार्शीशास पार जा, समुद्रतीरी राहणाऱ्यांनो तुम्ही आकांत करा.
7अति आनंदी, सुखी व वैभवशाली नगरी, हे तुमच्या बाबतीत घडले आहे, पूर्वीच्या काळापासून ती प्रसिध्द व नावजलेली होती, पण आता तीचेच पाय तिला परदेशात घेऊन जात आहेत.
8मुकुट देणार हे सोर, ज्याचे व्यापारी अधिकारी आहेत, ज्याचे वाणी पृथ्वीतले प्रतिष्ठीत आहेत, त्या विषयी हे कोणी योजीले?
9सर्व शोभेच्या वैभवाला डाग लावण्यासाठी व पृथ्वीतल्या सर्व प्रतिष्ठांना अप्रतिष्ठीत करण्यासाठी सेनाधीश परमेश्वराने हे योजिले आहे.
10हे तार्शीशच्या कन्ये नील नदीप्रमाणे आपली भूमी नांगर. सोर मध्ये तुला व्यापारी ठिकाण नाही.
11परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे आणि त्याने राज्ये हालवून टाकली. त्याने कनानाचे सर्व दुर्ग नष्ट करण्याची आज्ञा दिलेली आहे.
12तो म्हणतो, “हे कलंकीत भ्रष्ट झालेली सीदोन कन्ये तू येथून पुढे आनंदीत होणार नाहीस, उठ, सायप्रस पार कर, पण तेथेही तुला आराम मिळणार नाही.”
13खास्दयांचा देश पाहा तो आता नामशेष आहे, अश्शूर देशातील लोकांनी त्यास ओसाड करण्यासाठी जंगली पशुच्या स्वाधिन केले आहे त्यांनी त्यांचे बूरूज वेढा देण्यासाठी स्थापले आहेत व त्याचे ढीगारे बनवतील, समुद्रावर संचार करणाऱ्यानो रडा शोक करा कारण तुमच्या बंदराचा नाश झाला आहे त्याचा पुर्ण विध्वंस केलेला आहे.
14तार्शीशच्या जहाजांनो हाय हाय करा विलाप करा कारण तुमचे बंदर पूर्ण पणे नाश पावलेले आहे.
15त्या दिवसात असे घडेल की सर्व जगाला सोराची विस्मृती सतर वर्षेपर्यंत पडेल, सोर प्रदेशाची कोणालाच आठवण राहणार नाही तो पर्यंत एका राजाची कारकिर्द संपेल.
16हे विसरलेल्या वेश्ये, वीणा घे आणि नगरात फिर, ती छान प्रकारे वाजव, तुझी आठवण व्हावी म्हणून खुप गाणी गा.
17सत्तर वर्षाच्या शेवटी असे होईल की परमेश्वर देव सोराची मदत करील, तेव्हा ते आपल्या वेतनाकडे फिरेल, आणि भूमीच्या सर्व पाठीवर पृथ्वीतल्या सर्व राज्यांशी व्यभिचार करेल.
18तिच्या व्यापाराचा माल व त्याचे वतन परमेश्वरास पवित्र होईल, ते वतन साठवले जाणार नाही व राखून ठेवले जाणार नाही, तर जे परेश्वरासमोर राहतात त्यांनी भरपूर खावे व टिकाऊ वस्त्र घालावे म्हणून त्यांच्यासाठी त्याचा व्यापाऱ्याचा माल येईल.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.