इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहेज्केल 41

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नंतर त्या मनुष्याने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले आणि खांब मापले तो त्याची रुंदी एका बाजूला सहा हात व दुसऱ्या बाजूला सहा हात होती.
2दाराची रुंदी दहा हात होती; त्याची भिंत एका बाजूला पाच हात व दुसरी पाच हात होती; मग मनुष्याने पवित्रस्थानाचे मोजमाप मोजले त्याची लांबी चाळीस हात व रुंदी वीस हात मापली.
3मग तो मनुष्य परम पवित्रस्थानात गेला आणि त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व प्रत्येक बाजूच्या भिंतीची रुंदी सात हात भरली.
4मग त्याने खोलीची लांबी मोजली ती वीस हात होती. आणि त्याची रुंदी वीस हात मंदिरासमोर होती. मग तो मला म्हणाला, “हे परम पवित्रस्थान आहे.”
5मग मनुष्याने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती सहा हात जाड होती. मंदिराच्या सभोवती प्रत्येक बाजूला खोल्या होत्या त्या प्रत्येकाची रुंदी चार हात होती.
6तेथे बाजूस असलेल्या खोल्या एकीवर एक अशा तीन मजली असून त्या रांगेने तीस होत्या. मंदिराच्या भोवताली असलेल्या खोल्यांसाठी जी भिंत होती तिला त्या लागलेल्या होत्या तरी त्या मंदिराच्या भिंतीला जोडलेल्या नव्हत्या.
7आणि बाजूच्या खोल्या इमारतीच्या सभोवार वरवर गेल्या तसतशा रुंद होत गेल्या आणि सभोवतालचा भाग वरवर गेला तसतसा तो रुंद होत गेला; म्हणून या इमारतीची रुंदी वरच्या बाजूस अधिक होती, अशी ती रुंदी खालच्यापेक्षा मधल्या मजल्यात व तेथल्यापेक्षा वरच्या मजल्यात वाढत गेली.
8मग मी मंदिराला उंच पाया होता असे पाहिले; बाजूच्या खोल्यांचे पाये सहा हातांची एक मोठी काठी असे भरले.
9बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंतीची जाडी पाच हात होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्यास लागून एक जागा खुली राहिली होती.
10या खुल्या जागेच्या दुसऱ्या बाजूला याजकासाठी बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या. ही जागा मंदिरासभोवती सर्व बाजूंनी वीस हात अंतर होती.
11बाजूच्या खोल्यांची दारे खुल्या जागेकडे होती. एक दरवाजा उत्तरेकडे आणि दुसरा दक्षिणेकडे होता. या खुल्या जागेची रुंदी चोहोकडून पांच हात होती.
12मंदिराच्या पश्चिमेस सोडलेल्या जागेतील जी इमारत होती तिची रुंदी सत्तर हात होती. तिची भिंत चोहोकडून पांच हात जाड आणि लांबी नव्वद हात लांब होती.
13मग त्या मनुष्याने मंदिराचे मोजमापे केले. ती सोडलेली जागा व भिंतीसह इमारत ही शंभर हात लांब होती.
14मंदिराची समोरची बाजू आणि पूर्वेकडील सोडलेली जागा यांची रुंदी शंभर हात होती.
15नंतर त्या मनुष्याने मंदिराच्यामागे असलेल्या, त्या सोडलेल्या जागेपुढच्या इमारतीची लांबी व दोन्ही बाजूस असलेले सज्जे, पवित्र स्थान व अंगणातील द्वारमंडप ही सर्व शंभर हात मोजली.
16तीनही मजल्यासभोवतालची सज्जे, आतील भिंती आणि खिडक्या, अरुंद खिडक्या आणि यांस लाकडी तावदाने होती.
17मंदिरातल्या व बाहेरच्या बाजूची द्वाराजवळची जागा, सभोवतालच्या सर्व भिंतीचे आतील व बाहेरील माप हे योग्य होते.
18आणि ते करुब आणि खजुरीच्या झाडांनी सजवलेले होते. प्रत्येक दोन करुबामध्ये एक खजूराचे झाड होते. आणि प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती.
19करुबाला एका खजुरीच्या झाडाकडे मनुष्याचे मुख व दुसऱ्या खजुरीच्या झाडाकडे तरुण सिंहाचे मुख होते. मंदिरावर चोहोंकडे अशाप्रकारचे काम होते.
20जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत मंदिराच्या भिंतीवर करुब व खजुरीची झाडे केलेली होती.
21मंदिराच्या द्वारांचे खांब चौरस होते. परमपवित्रस्थानाच्या पुढच्या बाजूचे स्वरूप मंदिराच्या सारखेच होते.
22पवित्र स्थानासमोर वेदी लाकडाची असून तीन हात उंच व दोन हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या. मग त्या मनुष्याने मला म्हटले, “परमेश्वराच्या पुढे असणारे हे मेज आहे.”
23पवित्र स्थानाला आणि परमपवित्रस्थानाला दोन दोन दारे होती.
24प्रत्येक दरवाजाला दोन व दुसऱ्यास दोन अशा प्रत्येक तावदानाला दोन दोन बिजागऱ्या होत्या.
25जसे भिंतीवर केलेले होते तसे त्यावर, मंदिराच्या दारांवर करुब व खजुरीची झाडे कोरली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूस लाकडाचे छत होते.
26द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या अरुंद खिडक्या असून त्यावर खजुरीची झाडेही कोरली होती. मंदिराच्या या बाजूच्या खोल्या आणि त्यास पुढे आलेले छतही होते.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.