इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहेज्केल 40

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1आमच्या बाबेलच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षात, वर्षाच्या आरंभी, महिन्याच्या दहाव्या दिवशी, यरूशलेम नगर काबीज झाल्यानंतर साधारण चौदाव्या वर्षी, परमेश्वराचा हात माझ्यावर होता आणि त्याने मला तेथे नेले.
2दृष्टांतात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्यावर दक्षिणेकडे नगराची इमारतीसारखे काही होते.
3मग त्याने मला तेथे आणले. पाहा तेथे पितळेच्या रूपासारखा असा एक मनुष्य होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापण्याची काठी होती. व तो वेशीजवळ उभा होता.
4तो मनुष्य मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू आपल्या डोळ्यांनी पाहा व कानांनी ऐक. आणि मी तुला जे काही दाखवितो त्या सर्वाकडे आपले चित्त लाव, कारण मी ते तुला दाखवावे म्हणून तुला इकडे आणले आहे; जे काही तू पाहतोस ते इस्राएलाच्या घराण्याला प्रगट कर.”
5मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात लांब होती. हे माप एक हात व चार अंगुले होते. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक काठी भरली. मग त्या मनुष्याने भिंतीची उंची मोजली. ती एक काठी भरली.
6मग तो मनुष्य पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक काठी रुंद होता. दुसरा उंबरठाही तेवढाच रुंद होता.
7चौकीदाराची खोली एक काठी लांब व रुंदी एक काठी होती. आणि दोन खोल्यांच्या मधील अंतर पाच हात होते. मंदिरासमोरच्या द्वाराच्या द्वारमंडपाजवळील दाराचा उंबरठा एक काठी होता.
8मग त्याने मंदिरासमोरच्या द्वाराचा द्वारमंडप एक काठी मोजला.
9मग त्याने द्वारमंडपाचे माप घेतले ते आठ हात लांब भरले. आणि दोन खांब दोन हात मापले, आणि द्वाराचा द्वारमंडप मंदिरासमोर होता.
10पूर्वेकडील द्वाराच्या या बाजूला व त्या बाजूला तीन तीन चौक्या होत्या. त्या तिन्हीचे माप सारखेच असून दोन्ही बाजूचे खांबही एकाच मापाचे होते.
11त्या मनुष्याने द्वाराच्या प्रवेशमार्गाची रुंदी दहा हात आणि द्वाराची लांबी तेरा हात होती.
12त्या चौकांच्या पुढची जागा एका बाजूला एक हात व दुसऱ्या बाजूला एक हात होती. त्या चौक्या दोन्ही बाजूंना सहा सहा हात अशी होती.
13त्याने एका चौकीच्या छावणीपासून दुसरीच्या छावणीपर्यंतचे दाराचे मोजमाप केले ते दाराला दार धरून पंचवीस हात रुंदी भरली.
14त्याने साठ हात खांब केले. अंगण खांबापर्यंत द्वाराभोवती होते
15प्रवेशद्वारापासून आतील द्वाराच्या द्वारमंडपाच्या मुखापर्यंत पन्नास हात होते.
16त्या चौक्यांना बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान अरुंद खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुंद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती.
17मग त्या मनुष्याने मला मंदिराच्या बाहेरच्या अंगणात आणले. पाहा, तेथे अंगणाच्या सर्व बाजूंना खोल्या असून पदपथ केला होता. पदपथावर तीस खोल्या होत्या.
18द्वारांच्या दोन्ही बाजूस द्वाराच्या लांबी इतकाच पदपथ रुंद होता. ती खालचा पदपथ होता.
19मग त्या मनुष्याने खालच्या द्वाराच्या मुखापासून अंगणाच्या मुखापासून बाहेरून पूर्वेला शंभर हात आणि उत्तरेला शंभर हात असे मोजले.
20मग त्याने बाहेरच्या अंगणाचे जे द्वार उत्तरेकडे होते त्याची लांबी व रुंदीही मोजली.
21त्याच्या चौक्या या बाजूला तीन व त्या बाजूला तीन होत्या; त्यांचे खांब आणि कमानी ही पहिल्या द्वाराच्या मापाप्रमाणे होत्या; त्यांची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
22पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्या, व त्याच्या कमानी व त्यांची खजुरीची झाडे द्वारमंडप मापाच्या होत्या. द्वाराला सात पायऱ्या होत्या, त्याने लोक त्यामध्ये चढून जात असत व त्यांच्या कमानी त्यांच्यासमोर होत्या.
23आतल्या अंगणात पूर्वेकडच्या द्वारासारखे उत्तरेकडच्या द्वारासमोर एक द्वार होते. एका द्वारासमोर उत्तरेकडच्या द्वारासमोर एक द्वार होते. एका द्वारापासून दुसऱ्या द्वारापर्यंत त्याने शंभर हात मोजले.
24मग त्या मनुष्याने मला दक्षिणेकडे नेले. तो तेथे दक्षिणेकडे एक द्वार होते. त्याने त्यांचे खांब व त्यांच्या कमानी यांच मापल्या त्या पूर्वीच्या इतक्याच भरल्या.
25आणि त्यास व त्याच्या कमानीस सभोवार याच खिडक्यांसारख्या खिडक्या होत्या; लांबी पन्नास हात व रुंदी पन्नास हात होती.
26आणि त्यावर चढून जाण्यासाठी सात पायऱ्या होत्या व त्यांच्या कमानी त्यांच्यासमोर होत्या आणि त्यास त्याच्या खांबावर खजुरीची झाडे, एक या बाजूला व एक त्या बाजूला अशी होती.
27आणि आतल्या अंगणाच्या दक्षिणेला एक दार होते आणि त्याने एका द्वारापासून दुसऱ्या द्वारापर्यंत दक्षिणेकडे शंभर हात मापले.
28मग त्याने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले, दक्षिणेकडचे दार या मापाप्रमाणे मापले.
29त्याप्रमाणेच त्याने त्याच्या चौक्या, खांब व त्यावरल्या कमानी ही मापली, ती तेवढीच भरली; त्यास व सभोवतालच्या कमानींना अरुंद खिडक्या होत्या; त्यांची लांबी पन्नास हात व रुंदी पन्नास हात भरली.
30त्यास सभोवार कमानी होत्या. त्या एकंदर पंचवीस हात लांब, व पाच हात रूंद होत्या.
31त्याच्या कमानी बाहेरच्या अंगणाच्या बाजूला होत्या; त्याच्या खांबावर खजुरीची झाडे कोरली होती. त्यावर चढून जाण्यास आठ पायऱ्या होत्या.
32त्या मनुष्याने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणून त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापासारखेच होते.
33त्याच्या चौक्या, खांब, व कमानी या मापाप्रमाणे त्याने मापल्या; आणि त्यास व कमानीसभोवार खिडक्या होत्या; ते पन्नास हात लांब व पंचवीस हात रुंद होते.
34त्याच्या कमानी बाहेरच्या अंगणाकडे होत्या; आणि त्याच्या खांबावर या बाजूला व त्या बाजूला खजुरीची झाडे होती आणि त्याच्या चढणीस आठ पायऱ्या होत्या.
35मग मला त्या मनुष्याने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती.
36त्याच्या चौकीच्या खोल्या, त्याचे खांब व त्याच्या कमानी त्याने मापल्या; त्यास सभोवार खिडक्या होत्या; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
37आणि त्याचे खांब बाहेरच्या अंगणाकडे होते आणि त्याच्या खांबावर या बाजूला व त्या बाजूला खजुरीची झाडे होती; त्याच्यावर चढून जाण्यास आठ पायऱ्या होत्या.
38द्वारापाशी खांबाला लागून एकएक खोली असून तिला दार होते. तेथे होमबलि धूत असत.
39द्वारमंडपाच्या प्रत्येक बाजूला दोन मेजे होती. त्यावर होमार्पण, पापार्पण व दोषार्पण यासाठी आणलेले पशू कापीत असत.
40बाहेरच्या बाजूस, उत्तरेकडच्या दाराच्या प्रवेशाकडे चढण्याच्या वाटेवर, दोन मेजे होती आणि जे दुसऱ्या बाजूस द्वाराच्या द्वारमंडपाकडे होते त्या तेथेही दोन मेजे होती.
41द्वाराच्या या बाजूस चार मेजे व त्या बाजूस चार मेजे अशी आठ मेजे होती; त्या आठ मेजावर प्राण्यांना कापीत असत.
42आणि होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार मेजे होती. ती दीड हात लांब आणि दीड हात रुंद व एक हात उंच होती. ज्या हत्यारांनी होमबलि व यज्ञपशु कापीत ती या मेजावर ठेवीत असत.
43सर्व मंदिरात एक वीत लांबीचे आकडे भिंतीवर बसविलेले होते. अर्पण करण्यासाठी आणलेले मांस मेजावर ठेवीत असत.
44आतल्या द्वाराच्या बाहेरच्या बाजूला जे आतले अंगण उत्तरेकडच्या द्वाराच्या बाजूस होते त्यामध्ये गायकांच्या खोल्या होत्या; त्यांचे तोंड दक्षिणेकडे होते; एक पूर्वेकडील द्वाराच्या बाजूस होते, तिचे तोंड उत्तरेकडे होते.
45मग तो मनुष्य मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली ही खोली मंदिरात कामावर असलेल्या याजकाकरिता आहे.
46पण उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे काम करणाऱ्या याजकासाठी आहे. हे सादोकाचे वंशज आहेत, ते लेवीच्या वंशजातून परमेश्वराजवळ त्याची सेवा करायला येतात.”
47त्याने अंगण शंभर हात लांब व शंभर हात रुंद चौरस मोजले. वेदी मंदिरासमोर होती.
48मग त्या मनुष्याने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत पाच हात जाड आणि तीन हात रुंद होती. प्रवेशद्वाराची रुंदी चौदा हात होती.
49द्वारमंडपाची लांबी वीस हात व अकरा हात रुंदी होती. ज्या पायऱ्यांनी लोक त्यावर चढत असत त्यावरून मला नेले, द्वाराच्या खांबापाशी, या बाजूला एक व त्या बाजूला एक असे होते.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.