इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

निर्गम 34

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या दोन पाट्यांप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार कर म्हणजे फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्याच्यावर लिहीन.
2पहाटेस तयार हो व सीनाय पर्वतावर चढून ये आणि तेथे पर्वताच्या शिखरावर माझ्यासमोर हजर राहा.
3तुझ्याबरोबर कोणी चढून वर येऊ नये पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी मनुष्य दिसू नये; तसेच शेरडेमेंढरे कळप व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या पायथ्याशी चरू देऊ नकोस.”
4तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार केल्या; सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सीनाय पर्वतावर चढून गेला;
5तेव्हा मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला; आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली.
6परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,
7हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”
8मग मोशेने ताबडतोब भूमीपर्यंत वाकून परमेश्वरास नमन केले.
9मग तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी कृपादृष्टी जर माझ्यावर झाली असेल तर तू आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत हे मला माहीत आहे; तरी आमचा अन्याय व पाप यांची तू आम्हांला क्षमा कर आणि आपले वतन म्हणून आमचा स्वीकार कर.”
10मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
11मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी या लोकांस तुझ्यासमोरुन घालवून देतो.
12सावध राहा, नाही तर तू ज्या देशात जात आहेस त्यामध्ये राहणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही प्रकारे करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.
13परंतु त्यांच्या वेद्या पाडून टाक; त्यांचे स्तंभ तोडून टाक; त्यांच्या अशेरा मूर्ती फोडून टाक.
14तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नये; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान असे आहे; तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.
15तू सावध राहा. या देशातील रहिवाशाबरोबर कोणत्याही प्रकारचे करारमदार करू नको; ते व्यभिचारी मतीने आपल्या देवामागे लागून त्यांना बलिदान करतील. त्यातल्या कोणी तुला बोलावले असता तुम्ही त्यांच्या बलिदानातले काही खाल.
16त्यांच्या कन्यांची तुम्ही आपल्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवड कराल; त्यांच्या कन्या व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्यामागे जातील आणि त्या तुमच्या पुत्रांना व्यभिचारी बुध्दीने त्यांच्या नादी लावतील.
17तू आपल्यासाठी ओतीव देव करू नको.
18बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात मिसर देशातून तू बाहेर निघालास.
19प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नरवत्स माझे आहेत.
20गाढवीचे पहिले शिंगरु खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे, पण त्यास तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावा. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
21सहा दिवस तू आपले कामकाज कर, परंतु सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू विसावा घे.
22तू सप्ताहाचा, म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा.
23तुमच्या सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर रहावे.
24मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन; मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन; आणि वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यामोर हजर राहायला जाशील त्या वेळी तुझ्या देशाचा कोणीही लोभ धरणार नाही.
25माझ्या यज्ञबलीचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.
26हंगामाच्या वेळी तुझ्या जमिनीच्या उत्पन्नातील प्रथम पिकाचा सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर, ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”
27मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव, कारण याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.”
28मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून ठेवल्या.
29मग मोशे, साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्यास भान नव्हते.
30अहरोन व सर्व इस्राएल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्याजवळ जायला घाबरले;
31परंतु मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्याना बोलावले, तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, तो त्यांच्याशी बोलू लागला.
32त्यानंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही परमेश्वराने त्यास सीनाय पर्वतावर सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले.
33लोकांशी आपले बोलणे संपविल्यावर मोशेने आपला चेहरा आच्छादनाने झाकला.
34जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्यासमोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे; मग तो इस्राएल लोकांकडे बाहेर येऊन परमेश्वर जी काही आज्ञा देई ती तो त्यांना सांगत असे.
35मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.