इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

निर्गम 33

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्याबरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा; आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा.
2तुमच्यापुढे चालण्यासाठी मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांस तेथून घालवून देईन.
3दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशात तू जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हास नष्ट करीन.”
4ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत;
5कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हास भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.”
6म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागदागिन्यांवाचून राहिले.
7मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शनमंडप असे नाव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई.
8ज्या वेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्या वेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्यास निरखून बघत.
9जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
10जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत.
11मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
12मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.
13आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पाहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे.”
14परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.”
15मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस.
16तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?”
17मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”
18नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
19मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन.
20परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.”
21परमेश्वर म्हणाला, “माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा.
22माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन;
23नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.