इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

निर्गम 23

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1खोटी अफवा पसरवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस.
2दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नकोस, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नकोस.
3एखाद्या गरीब मनुष्याचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नकोस.
4आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्यास वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोड.
5तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्यास सोडून जाऊ नकोस, तू अवश्य त्याच्याबरोबर राहून ते सोड.
6तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नकोस;
7कोणावरही खोटे दोषारोप करू नकोस; एखाद्या निष्पाप वा निरपराधी ह्यांचा वध करू नकोस. कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही.
8लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तू मुळीच घेऊ नकोस; लाच घेऊ नको कारण लाच डोळसास आंधळे करते; आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपरीत न्याय करते.
9परक्याला कधीही छळू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हास चांगली माहिती आहे; कारण तुम्ही देखील एके काळी मिसर देशात परके होता.
10सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर; आणि तिचे उत्पन्न साठीव.
11परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक राहू दे. त्या वर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतूनाची वने यांच्या बाबतीतही असेच करावे.
12तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजेतवाने वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.
13मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत; इतर देवांचे नांव देखील घेऊ नका; ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका.
14वर्षातून तीनदा तू माझ्यासाठी उत्सव करून सण पाळ.
15बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यामध्ये सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
16शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.
17वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर यावे.
18तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करू नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये.
19आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.
20पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.
21त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक, आज्ञा पाळ आणि त्याच्यामागे चाल; त्याच्याविरुध्द बंड करू नकोस. कारण तो तुम्हास क्षमा करणार नाही; कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे.
22जर तू त्याची वाणी खरोखर ऐकशील व मी सांगतो ते सर्व करशील तर मी तुम्हाबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शत्रूंचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन.
23देव म्हणाला, माझा दूत तुमच्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन.
24परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नकोस; त्यांची सेवा करू नकोस, त्यांना जमीनदोस्त करावेस; आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावेस.
25तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.
26तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुला दीर्घायुषी करीन.
27ज्या ज्या लोकांच्या विरूद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवयास लावीन.
28मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी, व हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळावयास लावतील.
29मी त्यांना एका वर्षातच घालवून देणार नाही; कारण मी तसे केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग वनपशूंची वाढ होऊन ते तुला त्रास देतील.
30तुमची संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन.
31“मी तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. तेथे राहणाऱ्या लोकांस मी तुझ्या हाती देईन व तू त्या सर्वांना तेथून घालवून द्याल.
32तू त्याच्याशी किंवा त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नकोस.
33तू त्यांना तुझ्या देशात राहू देऊ नकोस; तू जर त्यांना तुझ्यामध्ये राहू देशील तर ते पुढे तुला सापळ्यासारखे अडकविणारे होतील, ते तुला माझ्याविरूद्ध पाप करायला लावतील व तू त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरुवात करशील.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.