इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

निर्गम 22

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.
2चोर घर फोडत असता सापडला व जीव जाईपर्यंत मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर येणार नाही.
3परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर मरणाऱ्यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे. त्याच्याजवळ काही नसेल तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.
4चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दुप्पट परत द्यावी.
5कोणी आपले जनावर मोकळे सोडले ते दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात जाऊन चरले व खाल्ले तर आपल्या शेतातील किंवा द्राक्षमळ्यातील चांगल्यात चांगल्या पिकातून त्याने त्याचे नुकसान भरून द्यावे.
6जर कोणी काटेकुटे जाळण्यासाठी आग पेटवली व ती भडकल्यामुळे धान्याच्या सुड्या किंवा उभे पीक जळाले तर आग पेटवणाऱ्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे.
7कोणी शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व त्याच्या घरातून चोरीस गेले, तर चोर सापडल्यावर त्याच्या दुप्पट किंमत चोराने भरून द्यावी.
8परंतु जर चोर सापडला नाही, तर घरमालकाला देवासमोर घेऊन जावे म्हणजे मग त्याने स्वतः त्या वस्तुला हात लावला की नाही त्याचा न्याय होईल.
9जर हरवलेला एखादा बैल, एखादे गाढव, मेंढरू किंवा वस्त्र यांच्यासंबंधी दोन मनुष्यात वाद उत्पन्न झाला, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर त्या हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्षांनी देवासमोर यावे; ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.
10एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले, परंतु ते जर मरण पावले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले;
11तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे सांगितले तर त्या जनावराच्या मालकाने त्याच्या शपथेवर विश्वास ठेवावा; मग त्या शेजाऱ्याला जनावराची किंमत भरून द्यावी लागणार नाही.
12त्याच्यापासून खरोखर ते चोरीस गेले असेल तर त्याची किंमत मालकाला भरून द्यावी.
13जर ते जनावर कोणी मारून टाकले असेल तर ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्यास भरपाई भरून द्यावी लागणार नाही.
14जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून त्याचे जनावर मागून घेतले मालक तेथे हजर नसताना त्या जनावराला जर इजा झाली किंवा ते मरण पावले तर त्या मालकाला त्याची किंमत अवश्य भरून द्यावी;
15जर त्या वेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरपाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आले आहे.
16आणि मागणी झाली नाही अशा कुमारिकेला फसवून जर कोणी तिला भ्रष्ट केले तर त्याने पूर्ण देज देऊन तिच्याशी लग्न केलेच पाहिजे;
17तिच्या पित्याने त्यास ती देण्यास नकार दिला तर भ्रष्ट करणाऱ्याने तिच्या पित्याला कुमारिकेच्या रीतीप्रमाणे पैसा तोलून द्यावा.
18कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
19पशुगमन करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
20परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बली करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
21उपऱ्याचा छळ करू नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता.
22विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही जाचू नका
23तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचाल आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन;
24व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हास तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.
25तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या एखाद्या गरीब मनुष्यास तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारू नये.
26तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरुण तुझ्याजवळ गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्याआधी तू त्याचे पांघरुण त्यास परत करावे;
27कारण त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार. ते घेतले तर तो काय पांघरूण निजेल? त्याने गाऱ्हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे.
28तू आपल्या देवाची निंदा करू नको किंवा तुझ्या लोकांच्या राज्यकर्त्याला शाप देऊ नको.
29आपल्या हंगामातले व आपल्या फळांच्या रसातले मला अर्पण करण्यास हयगय करू नको. तुझा प्रथम जन्मलेला पुत्र मला द्यावा;
30तसेच प्रथम जन्मलेले बैल व मेंढरे, यांना जन्मल्यापासून सात दिवस त्यांच्या आईजवळ ठेवावे व आठव्या दिवशी ते मला द्यावेत.
31तुम्ही माझे पवित्र लोक आहात म्हणून फाडून टाकलेल्या पशूंचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.