इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

अनुवाद 33

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांस आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, तो असाः
2“परमेश्वर सीनाय येथून आला. उष:कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला, दहा हजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिक त्याच्याबरोबर होते.
3परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरेच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात.
4मोशेने आम्हास नियमशास्त्र दिले. ती शिकवण याकोबाच्या लोकांची ठेव आहे.
5इस्राएलचे सर्व वंश आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.
6रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.”
7मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला: “परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करून दे. त्यास शक्तीशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्यास साहाय्यकारी हो.”
8लेवीविषयी मोशे असे म्हणाला: “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवीची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करून घेतलीस.
9हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला.
10ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलाला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.
11परमेश्वरा, जे जे लेवीचे आहे त्यास आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्विकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करून टाक.”
12बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वरास प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या देशात राहील.”
13योसेफाविषयी तो म्हणाला, “योसेफाच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
14सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्यास देवो.
15टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.
16धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफाला मिळो. योसेफाची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती. तेव्हा जळत्या झुडूपातल्या, परमेश्वराचा दुवा त्यास मिळो.
17प्रथम जन्मलेल्या गोऱ्हासारखा त्याचा प्रताप आहे. त्याचे शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करून त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”
18मोशे जबुलूनबद्दल म्हणाला, “जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
19ते लोकांस आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील.”
20गादविषयी मोशे म्हणाला, “गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरून बसतो. आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो.
21स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वतःला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.”
22दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”
23नफताली विषयी मोशेने सांगितले, “नफताली, तू सर्व चांगल्या गोष्टीने समाधानी त्या तुला भरभरून मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
24आशेर विषयी मोशने असे सांगितले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
25तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”
26हे यशुरुना! परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
27देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ राहते! तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. शत्रूंना नष्ट कर असे तो म्हणतो.
28म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षरसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
29इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची महान ठिकाणे तू तुडवशील!
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.