इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

अनुवाद 32

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1“हे आकाशा, ऐक मी काय म्हणतो ते.” पृथ्वी ऐक शब्द माझ्या मुखातले.
2पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव माझे भाषण दहीवराप्रमाणे ठिबको. तो बोध असेल जमिनीवरुन खळखळणाऱ्या पाण्यासारखा. हिरवळीवर रिझमझिमणाऱ्या पावसासारखा. झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरीसारखा.
3मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन. तुम्हीही परमेश्वराची महती गा!
4तो माझा दुर्ग आहे आणि त्याची कृती परिपूर्ण! कारण तो, त्याचे सर्व मार्ग, उचित आहेत! देवच खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ आहे.
5तुम्ही त्याची मुले नाहीत. तुमची पापे त्यास मळीन करतील. तुम्ही लबाड आहात.
6मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो, परमेश्वराशी असे वागता? तो तर तुमचा पिता, निर्माता कर्ता आणि धर्ता तोच आहे.
7आठवण करा पूर्वी काय घडले ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले ते लक्षात आणा; आपल्या बापाला विचारा, तो सांगेल आपल्या वडीलजनांना विचारा, ते सांगतील.
8परात्पर देवाने लोकांची विभागणी राष्ट्रा राष्ट्रांमध्ये केली. प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला. देवाने इस्राएल लोंकाच्या संख्येप्रमाणे राष्ट्राच्या सीमा आखल्या.
9परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होत. याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा आहे.
10याकोब त्यास तो वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात सापडला त्याने त्याच्याजवळ राहून त्याची काळजी घेतली आणि डोळ्यातील बाहूलीप्रमाणे त्यास सांभाळले.
11इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते. पिल्ले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते. तसा परमेश्वर इस्राएलाला जपतो.
12परमेश्वरानेच इस्राएलाला पुढे आणले. दुसरा कोणी देव मदतीला नव्हता.
13परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्यास खडकातून मध दिला, त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.
14गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी आणि दूध, पुष्ट मेंढे व कोकरे, बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे, उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले. द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यालात.
15पण यशुरुन पुष्ट होऊन लाथा झाडू लागला. तो धष्टपुष्ट झाला! तो लठ्ठ झाला, तो तुकतुकीत झाला आणि त्याने आपल्या तारणकर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.
16त्यांनी अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याची ईर्ष्या जागवली. मूर्ती त्यास मान्य नाहीत, तरी या लोकांनी मूर्ती केल्या व त्याचा कोप ओढवला.
17खरे देव नव्हेत अशा भुतांना त्यांनी यज्ञार्पणे केली. अपरिचित दैवतांची पूजा केली. आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली.
18आपल्या निर्माणकर्त्याच्या दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी देवाला ते विसरले.
19परमेश्वराने हे पाहिले व आपल्या प्रजेचा धिक्कार केला. कारण प्रजेनेच त्यास चिथवले होते!
20तो म्हणाला, मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो. त्यांचा शेवट कसा होईल ते मी पाहीन, कारण ही माणसे फार कुटील आहेत. ही मुले अविश्वसनीय मुलांप्रमाणे आहेत.
21मूर्तीपूजा करून यांनी माझा कोप ओढवला. मूर्ती म्हणजे देव नव्हेत. क्षुल्लक मूर्ती करून त्यांनी मला क्रुद्ध केले. तेव्हा त्यांना मत्सर वाटेल असे मी करीन. जे एकसंध राष्ट्र नाही अशा लोकांमार्फत, मूढ राष्ट्राच्या योगे मी यांना इर्ष्येस पेटवीन.
22माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.
23मी इस्राएलांवर संकटे आणीन. त्यांच्यावर मी माझ्या बाणांचा नेम धरीन.
24भुकेने ते कासावीस होतील. भयंकर प्रखर तापाने व भंयकर मरीने ग्रस्त होतील. वनपशू त्यांच्यावर सोडीन. विषारी साप व सरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील.
25रस्त्यावर सैन्य त्यांना तलवारीने मारेल व घरात ते भयभीत होतील. तरूण पुरुष, स्त्रिया, लहानमुले व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल.
26लोकांच्या आठवणीतून ते पुसले जातील इतका मी या इस्राएलांचा नाश केला असता.
27पण त्यांचा शत्रू काय म्हणेल हे मला माहीत आहे. आम्ही आमच्या सामर्थ्याने जिंकलो. इस्राएलांचा नाश काही परमेश्वरामुळे झाला नाही, अशी ते बढाई मारतील.
28इस्राएल राष्ट्र विचारशून्य आहे, त्यास समज म्हणून नाहीच.
29ते शहाणे असते तर त्यांना समजले असते. त्यांनी पुढच्या परिणामांचा विचार केला असता.
30एक मनुष्य हजारांचा पाठलाग करु शकेल काय? दोघेजण दहा हजारांना सळो की पळे करून सोडू शकतील का? परमेश्वरानेच या जमावला आपल्या शत्रूच्या हवाली केले तरच ते शक्य आहे. खंद्या दुर्गासमान असणाऱ्या परमेश्वराने त्यांना गुलामांसारखे विकले तरच असे घडेल.
31आपल्या शत्रूंचा दुर्ग म्हणजे परमेश्वर आपल्या अभेद्य किल्यासारख्या परमेश्वराच्या तोडीचा नाही हे तेही कबूल करतात.
32सदोम आणि गमोरा येथल्याप्रमाणे त्यांची द्राक्षे विषारी आहेत त्यांचे घोस कडूच आहेत.
33त्यांची द्राक्षे कडू जहर आणि द्राक्षरस अजगराचे विषारी गरळासमान आहे.
34परमेश्वर म्हणतो अर्थात ही शिक्षा सध्या मी राखून ठेवली आहे. माझ्या भांडारात ती बंदीस्त ठेवली आहे.
35अनवधानाने त्यांच्या हातून काही दुष्कृत्ये घडायची मी वाट पाहत आहे. त्यांनी काही वावगे केले की त्यांचा संकटकाळ आलाच म्हणून समजा मी त्यांना शिक्षा करीन.
36परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील. आपल्या सेवकांवर दया दाखवील. पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन, असहाय्य करून सोडील.
37परमेश्वर म्हणेल, कोठे आहेत ते खोटे देव? तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे तुमचा दुर्ग?
38ते खोटे दैवत तुमच्या यज्ञातील चरबी खाणारे, तुम्ही अर्पण केलेल्यातील द्राक्षरस प्राशन करणारे दैवत कोठे आहेत? तेव्हा त्या दैवतांनीच उठून यावे व तुम्हास साहाय्य करावे!
39तेव्हा आता पाहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे. अन्य कोणी नाही. लोकांचा तारक मी आणि मारकही मीच, त्यांना घायाळ करणारा मी आणि त्यातून बरे करणाराही मीच. माझ्या समर्थ हातांमधून कोणीही कोणालाही सोडवू शकत नाही!
40आकाशाकडे बाहू उभारुन मी हे वचन देत आहे. मी सनातन आहे हे सत्य असेल तर या गोष्टी खऱ्या होतील.
41माझी लखलखाती तलवार परजून मी शत्रूंना शासन करीन. ते याच शिक्षेला पात्र आहेत.
42माझे शत्रू ठार होतील. त्यांचा पाडाव होईल ते कैद होतील. माझ्या बाणांची टोके त्यांच्या रक्ताने माखतील आणि माझे तलवारीचे पाते शत्रू सैन्याचा शिरच्छेद करील.
43समस्त राष्ट्रांनो, देवाचा प्रजेचा जयजयकार करा. कारण हा देव आपल्या सेवकांच्या बाजूने उभा राहतो. आपल्या सेवकांचा संहार करु पाहणाऱ्यांना शासन करतो. शत्रूला योग्य अशी शिक्षा देतो. आणि आपली प्रजा आणि प्रदेश ह्यांच्यासाठी प्रायश्चित करतो.
44मोशेने या गीताचे शब्द सर्व इस्राएलांना ऐकू जातील असे ऐकवले. नूनाचा पुत्र होशा (म्हणजेच, यहोशवा) मोशेबरोबर होता.
45ह्याप्रमाणे मोशेने ही सर्व वचने इस्राएल लोकांस सांगण्याचे संपविल्यावर
46मोशे लोकांस म्हणाला, “मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा.
47त्यांचे महत्व कमी लेखू नका. या आज्ञांवरच तुमचे जीवन अवलंबून आहे. त्यायोगेच तुम्ही आपल्याला मिळणार असलेल्या त्या यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य कराल.”
48त्याच दिवशी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
49“मवाब देशात, यरीहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्राएलांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील.
50या डोंगरावर तुझे निधन होईल. तुझा भाऊ अहरोन हा जसा होर डोंगरावर मृत्यू पावल्यावर स्वजनांना मिळाला तसेच तुझे होईल.
51कारण तुम्ही दोघांनीही माझ्याविरूद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्राएलांसमोर तुम्ही माझा विश्वासघात केला तसेच मला पवित्र मानले नाही.
52तेव्हा मी इस्राएलांना देणार असलेली भूमी तू पाहू शकतोस पण तुझे तेथे जाणे होणार नाही.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.