इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

दानिएल 5

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1काही वर्षानंतर, एकदा बेलशस्सर राजाने आपल्या हजारो सरदारांस घेवून एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांच्या समोर तो द्राक्षरस प्याला.
2बेलशस्सराने द्राक्षरस चाखल्यावर आज्ञा केली की, सोन्या चांदीची ती पात्रे घेवून या जी त्याचा बाप नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून आणली होती. ह्यासाठी की, राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी व उपपत्नी हयांना त्यातून द्राक्षरस पिता येईल.
3तेव्हा सेवक सोन्याची ती पात्रे घेवून आले, जी यरूशलेमेतील देवाच्या मंदीरातून आणलेली होती. मग राजा त्याचे सरदार, त्याच्या पत्नी त्याच्या उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली.
4ते द्राक्षरस पिवून सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड आणि दगडाच्या घडलेल्या मूर्तीचे स्तवन करू लागले.
5त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तिथे दिपस्तंभासमोर प्रगट झाली आणि त्यांनी राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर असे काही लिहीले जे राजास वाचता येईल.
6तेव्हा राजाचा चेहरा पडला तो चिंतातूर झाला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.
7राजाने मोठ्याने बोलून आज्ञा केली की, जे भूतविद्या करणारे खास्दी लोक, ज्योतिषी यांना घेवून या. राजा बाबेलातील ज्ञानी लोकांस म्हणाला, “जो कोणी हे लिखान वाचून त्याचा अर्थ मला सांगेल त्यास जांभळा पोशाख आणि सोन्याचा गोफ देण्यात येईल. जो राज्यांतील तीन राज्यकर्त्यातील एक होईल.
8राजाचे सर्व ज्ञानी लोक आले पण त्यांना तो लेख वाचता येईना आणि त्याच्या अर्थ राजास सांगता येईना.”
9तेव्हा राजा बेलशस्सर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले.
10राजा आणि सरदार यांचे बोलणे ऐकूण राणीची आई त्या मेजवाणी गृहात आली. ती म्हणाली, “महाराज चिरायू असा चिंतातूर होऊ नका आपली मुद्रा पालटू देवू नका.
11आपल्या राज्यात एक असा पुरूष आहे ज्यात पवित्र देवाचा आत्मा वसतो. आपल्या वडिलाच्या राज्यात, प्रकाश, विवेक, देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान त्यामध्ये दिसून आले आपला बाप राजा नबुखद्नेस्सराने त्यास सर्व जादूगार भूतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतीषी यावर प्रशासक म्हणून त्यास नेमले.
12उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे, आणि अडचणी सोडवणे, या गुंणवत्ता ज्या दानीएलात आढळल्या त्यास बेल्टशस्सर नाव दिले. आता त्या दानीएलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल.”
13नंतर दानीएलास राजासमोर आणले. “राजा त्यास म्हणाला तू दानीएल आहेस, यहूदातून पकडून आणलेल्या बंदीवानातील एक ज्यास माझ्या वडिलाने पकडले होते.
14मी तुझ्याविषयी ऐकले आहे, की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान हे तुझ्या ठायी दिसून आले आहे.
15मला हा लेख वाचून त्याचा अर्थ सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक जे भुतविदया करणारे मजसमोर आहेत पण त्यांना ह्याचा अर्थ सांगता येईना.
16मी तुझ्याबाबतीत ऐकले आहे की तू ह्याचा अर्थ सांगून हे सोडवू शकतो आता जर तू मला हे लिखाण वाचून त्याचा अर्थ सांगशील तर मी तुला जांभळे वस्त्र व तुझ्या गळयात सोन्याचा गोफ देवून तुला राज्यातील ज्ञानी प्रशासकांपैकी एक प्रशासक करील.”
17नंतर दानीएलाने राजास उत्तर दिले, “तुझ्या भेटी तुलाच राहू दे आणि तुझी बक्षीसे दुसऱ्यांना दे तरीही मी लिखान वाचून तुला त्याचा अर्थ सांगतो.
18हे राजा सर्वोच्च देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सराला राज्य, महानता, प्रतिष्ठा आणि वैभव दिले.
19त्याने त्यास मोठेपणा दिल्यामुळे सर्व राष्ट्रांचे लोक, दास, भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्यास भित होते. त्यास वाटेल त्यास तो ठार करीत असे, किंवा जीवन देत असे.
20पण जेव्हा त्याचे हृदय ताठ झाले आणि त्याचा आत्मा कठोर झाला तो मुद्दामपणे वागला तेव्हा त्यास राजपदावरून काढून त्याचे वैभव हिरावण्यात आले.
21त्यास मानवातून हाकलून देण्यात आले. त्याचे हृदय पशूसारखे झाले आणि तो रानगाढवात राहीला. तो बैलासारखे गवत खाई, व त्याचे शरीर दवाने भिजत असे. मानवी राज्यावर सर्वोच्च देवाची सत्ता आहे व तो पाहीजे ते त्याने स्थापीत करतो हे ज्ञान त्यास प्राप्त होईपर्यंत तो असा राहिला.
22हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस.
23तर स्वर्गीय प्रभूशी तू उद्दामपणा केलास त्याच्या मंदीरातील सुवर्णपात्र त्यांना आणून तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी, आणि तुझ्या उपपत्नी त्यामधून द्राक्षरस प्याला आहात आणि सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड, आणि दगड हयापासून बनलेल्या मूर्ती ज्या पाहत नाहीत ऐकत नाहीत, किंवा समजत नाही त्यांचे तू स्तवन केलेस पण ज्याच्या हातात तुझा जीव आहे व जो तुझे सर्व मार्ग जाणतो त्या देवास मान दिला नाहीस.
24म्हणून देवाने त्याच्या उपस्थितीतून आपला हात लिहीण्यास पाठविला आणि हे लिहीले.
25हा लिखीत लेख असा: ‘मने, मने, तकेल, ऊफारसीन.’
26ह्याचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे.
27तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस.
28परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी हयांना दिले आहे.”
29तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केली आणि त्यांना दानीएलास जांभळी वस्त्रे घालून त्याच्या गळयात सोन्याचा गोफ घातला आणि त्या विषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे.
30त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याला ठार मारण्यात आले.
31आणि दारयावेश मेदी हा बासष्ट वर्षाचा असता राजा झाला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.