इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

दानिएल 4

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नबुखद्नेस्सर राजाने सर्व लोक राष्ट्र आणि पृथ्वीवरील सर्व भाषा बोलाणाऱ्या लोकात फर्मान पाठवले की, तुमचे कल्याण होवो.
2सर्वोच्च देवाने जी चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हास सांगावे हे मला बरे वाटले आहे;
3त्याची चिन्हे किती थोर, त्याचे चमत्कार किती अद्भूत, त्याचे राज्य हे सार्वकालीक राज्य आहे. त्याचे स्वामित्व पिढ्यानपिढ्या राहते.
4मी, नबुखद्नेस्सर, माझ्या घरात सुखाने राहत हातो आणि माझ्या महलात समृद्धीचा उपभोग घेत होतो.
5मी स्वप्न पाहिले आणि घाबरलो मी त्यावेळी आपल्या पलंगावर पडलो होतो. त्या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले.
6म्हणून मी आज्ञा केली की, बाबेलातील सर्व ज्ञानी लोकांस मजकडे आणावे म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलघडा करतील.
7तेव्हा जादूगार, भुतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतिषी हे मजकडे आले. मी त्यांना स्वप्न सांगितले पण त्याचा उलघडा त्यांना होईना.
8शेवटी दानीएल आत आला, त्यास मी माझ्या देवाचे नाव बेल्टशस्सर दिले आहे. त्यास मी स्वप्न सांगितले.
9बेल्टशस्सरा, सर्व ज्ञान्यांच्या अधिकाऱ्या, मला ठाऊक आहे पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये निवास करतो आणि तुला कोणतेही गुढ रहस्य अवघड नाही. मला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मला सांग.
10मी माझ्या पलंगावर पडलो असता मला दिसले ते असे, मी पाहिले, पृथ्वीच्या मधोमध एक मोठा वृक्ष होता आणि त्याची उंची खूप मोठी होती.
11तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशात पोहचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहचला.
12त्याची पाने सुंदर होती, त्यास भरपूर फळे असून ती सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशु त्याच्या सावलीत आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यामध्ये राहत. तो वृक्ष सर्व जिवितांचे पोषण करीत असे.
13मी माझ्या बिछान्यात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला.
14तो मोठ्याने ओरडून म्हणाला हा वृक्ष तोडून टाका आणि त्याच्या फांद्या छाटून टाका, त्याची पाने काढून टाका आणि फळे विखरा, त्याच्या खाली राहणारे प्राणी पळून जावो आणि फांद्यांतील पाखरे उडून जावोत.
15पण त्याचा बुंधा जमिनीत राहू दया. त्यास लोखंड आणि पितळेच्या पट्टया बांधून, कुरणाच्या कोवळ्या गवतात राहू द्या. त्यास आकाशातील दहीवरात भिजू द्या, वनपशुंबरोबर त्यास भूमीवरील गवताचा वाटा मिळू द्या.
16त्याचे मानवी हृदय जावून त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त होवो, तो पर्यंत सात वर्षे होऊन जातील.
17हा निर्णय त्या देवदुताच्या घोषणेद्वारे आणि पवित्रजनांच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो, आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापतो, असे जिवंतांनी जाणावे.
18हे स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजाने पाहिले आता तू हे बेल्टशस्सरा ह्याचा अर्थ मला सांग कारण माझ्या राज्यातल्या ज्ञानी जनांपैकी कोणीही ह्याचा अर्थ सांगू शकत नाही, पण तू हे सांगू शकतोस, कारण देवाचा पवित्र आत्मा तुझ्याठायी राहतो.
19मग दानीएल, ज्यास बेल्टशस्सर नाव देण्यात आले होते तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, “बेल्टशस्सर हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बोलटशस्सर म्हणाला, “माझ्या स्वामी हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि याचा अर्थ तुझा शत्रुस लागू पडो.
20जो वृक्ष तू पाहीला, जो वाढून मजबुत झाला आणि ज्याचा शेंडा आकाशात गेला ज्यास सर्व पृथ्वीवरून पाहता येत होते.
21ज्यांची पाने सुंदर आणि फळे भरपूर असून ती सर्वांसाठी पुरेशी होती. त्याच्या सावलीत वनपशू राहत आणि फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी राहत होते.
22हे राजा तो वृक्ष तू आहेस, तू वाढून बलवान झालास तुझी थोरवी आकाशापर्यंत पोचली आहे, तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहचतात.
23हे राजा, तू एक स्वर्गदूत पाहिला जो स्वर्गातून खाली येवून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा, पण त्यांचा बुंधा जमिनीत राहू दया, ह्याला लोखंड आणि पितळेच्या पट्टयांनी बांधून कुरणातल्या कोवळया गवतात राहू दया त्याने आकाशाचे दव भिजवो, तो सात वर्षे वनपशुसोबत राहो.’
24हे राजा ह्याचा अर्थ, असा सर्वोच्च देवाचा हा आदेश आहे. जो माझ्या राजापर्यंत पोचला आहे.
25तुला मनुष्यातून काढून टाकण्यात येईल, तुझी वस्ती वनपशुमध्ये होईल. तुला बैलासारखे गवत खावे लागेल. आकाशातील दवाने तू भिजशील, सात वर्षे जाईपर्यंत तू हे जानशील की, मानवावर देवाची सत्ता आहे.
26जसे सांगण्यात आले आहे की, त्या वृक्षाची बुंधे तशीच राहू दया, हयाच प्रकारे, जेव्हा तू स्वर्गाचे नियम शिकशील तुझे राज्य तुला पुन्हा प्राप्त होईल.
27म्हणून हे राजा माझी मसलत तुला मान्य असो, पाप सोडून योग्य ते कर, आपली दुष्टता सोडून जाचलेल्यावर दया कर. असे केल्यास तुझी समृध्दी जास्त दिवस राहील.”
28-29हे सर्व राजा नबुखद्नेस्सरासोबत बारा महिन्यात घडून आले तो बाबेलातील राजवाड्यात फिरत होता.
30“काय ही महान बाबेल नगरी, जी मी माझ्या राज निवासासाठी आणि माझ्या गौरवासाठी बांधली.”
31जेव्हा राजा हे बोलत होता. पाहा स्वर्गातून वाणी झाली, “राजा नबुखद्नेस्सरा, हे फर्मान ऐक, तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे.
32तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी वस्ती वनपशूत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्यांना देतो, हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्षे जातील.”
33हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.
34या दिवसाच्या शेवटी मी नबुखद्नेस्सराने माझे डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धीमत्ता मला परत मिळाली, मी सर्वोच्च देवाचे आभार मानले, जो सदाजिवी देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गाईली, कारण त्याचे प्रभूत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.
35भूतलावरील सर्व रहीवासी त्यास शुन्यवत आहेत. तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे, भूतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो, कोणीही त्यास थांबवू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की “तू हे का केले?”
36त्याच समयी माझी बुध्दीमत्ता परत मिळाली माझे राजवैभव आणि प्रताप मला परत प्राप्त झाले मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मला मोठी थोरवी प्राप्त झाली.
37आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गीय राजास गौरव देवून त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.