इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 इतिहास 23

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1यहोयादाने सातव्या वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामाचा पुत्र अजऱ्या यहोहानानाचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजऱ्या, अदायाचा पुत्र मासेया आणि जिख्रीचा पुत्र अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला.
2त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदाच्या नगरात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरूशलेम येथे गेले.
3तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला. यहोयादा या लोकांस म्हणाला, “परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्यास अनुसरुन राजाचा पुत्र गादीवर येईल.
4आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक-तृतीआंश याजक आणि लेवी शब्बाथाच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा.
5एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनात रहावे.
6कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये, याजक व सेवा करणारे लेवी यांनीच मात्र आत यावे कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपआपली कामे करायची आहेत.
7लेवींनी राजाला सर्व बाजूंनी घेराव घालावा. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायचा प्रयत्न केल्यास त्यास ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.
8लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथाच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली.”
9दावीद राजाचे भाले, छोट्या आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या.
10आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपआपले शस्त्र होते. मंदिराच्या सरळ उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच.
11मग त्यांनी राज पुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुकुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशाला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याचे पुत्र यांनी त्यास अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले.
12लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती लोकांकडे परमेश्वराच्या मंदिरात आली.
13पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजाजवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक गात होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखविण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी! फितुरी!” असे ती ओरडली.
14याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्यास तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली कि, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.”
15राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोहोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.
16यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.
17मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.
18यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदीरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वरास होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले
19कोणीही अशुद्धतेने मंदिराच्या आत येवू नये, म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले
20सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले.
21अथल्याचा तलवारीने वध झाला त्यानंतर यहूदातील लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरूशलेम नगर शांत झाले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.