इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

2 इतिहास 22

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1यहोरामाच्या जागी यरूशलेमेच्या लोकांनी यहोरामाचा सर्वांत धाकटा पुत्र अहज्या याला राजा केले. यहोरामाच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबी लोकांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामाच्या इतर सर्व थोरल्या पुत्रांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.
2त्यावेळी अहज्या बेचाळीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या व ती अम्रीची नात.
3अहज्याची वागणूकही अहाबाच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्यास दुराचरण करण्यास प्रवृत्त केले.
4अहाबाच्या कुटुंबियांनी केले तसेच, परमेश्वरास मान्य नसलेले पापाचरण अहज्याने केले. अहज्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर अहाबाच्या घराण्याने त्यास सल्ला द्यायला सुरुवात केली. त्याचे हे सल्ले अहज्याच्या भल्याचे नव्हते. त्या अयोग्य सल्ल्यामुळेच त्याच्यावर मृत्यू ओढवला.
5अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामाच्या बरोबर अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ-गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा पुत्र. योराम या लढाईत अराम्याकडून जखमी झाला.
6तो हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र यहोराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अजऱ्या त्याच्या समाचारास गेला.
7अहज्या (किंवा यहोआहाज) योथामाला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी केले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामाबरोबर निमशीचा पुत्र येहू याला भेटायला गेला. अहाबाच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती.
8अहाबाच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले.
9यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या मनुष्यांनी त्यास तो शोमरोनात लपायच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्यास ठार केले आणि त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटाचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वरास शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.
10अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला पुत्र मरण पावला आहे हे पाहिल्यावर तीने यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला.
11पण राजाची कन्या यहोशबाथ हिने अहज्याचा पुत्र योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामाची कन्या आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथाने योवाशाला लपवल्यामुळे अथल्या त्यास मारु शकली नाही.
12परमेश्वराच्या मंदिरात त्यास याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने त्या जागेवर राज्य केले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.