इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 शमुवेल 15

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1शमुवेल शौलाला म्हणाला, “परमेश्वराने आपले लोक इस्राएल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले तर आता तू परमेश्वराची वचने ऐक.
2सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.
3आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रिया मुले व बालके व गाय-बैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.”
4मग शौलाने लोकांस बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ होते व यहूदातील माणसे दहा हजार होती.
5मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.
6तेव्हा शौलाने केनी लोकांस म्हटले, “अमालेक्याबरोबर तुम्हास मारू नये म्हणून तुम्ही त्याच्यांमधून निघून जा; कारण इस्राएल लोक मिसरांतून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहाने वर्तला.” तेव्हा केनी अमालेक्यामधून निघून गेले.
7मग शौलाने हवीला पासून मिसरासमोरील शूरापर्यंत अमालेक्यांना मार दिला.
8त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तलवारीच्या धारेखाली जिवे मारले.
9तथापि शौलाने व लोकांनी अगागला जिवंत ठेवले; तसेच मेंढरे, बैल, पशु, कोकरे, असे जे काही चांगले धष्टपुष्ट ते राखून ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे टाकाऊ आणि निरूपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी संपूर्ण नाश केला.
10तेव्हा परमेश्वराचे वचन शमुवेलाकडे आले, ते म्हणाले,
11“मी शौलाला राजा केले याचे मला दु:ख होत आहे. कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराचा धावा केला.
12शमुवेल शौलाला भेटण्यासाठी पहाटेस उठला. तेव्हा कोणी शमुवेलाला सांगितले की, शौल कर्मेलास आला होता आणि पाहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे.
13मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौल त्यास म्हणाला, “परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो! मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.”
14तेव्हा शमुवेल म्हणाला, “तर मेंढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय-बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?”
15मग शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली. कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत. पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला.”
16तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले, “तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले.” ते मी तुला ऐकवतो. शौल त्यास म्हणाला, “बोला!”
17मग शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले”
18परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की, जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर. ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर.
19तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले?
20तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यामध्ये मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे.
21परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली.”
22शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.
23कारण बंडखोरी जादुगीरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.”
24मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.
25तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
26शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही; कारण तू देवाचे वचन धिक्कारले, आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राज्य करण्यापासून धिक्कारले आहे.”
27शमुवेल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.
28तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले, “परमेश्वराने आज इस्राएलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्यास दिले आहे.
29तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.”
30तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. तरी आता मी तुला विनंती करतो माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्राएलासमोर तू माझा सन्मान कर आणि परमेश्वर तुझा देव याचे भजन पूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
31मग शमुवेल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने परमेश्वराचे भजन पूजन केले.
32मग शमुवेल म्हणाला, “अमालेक्याचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा.” तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला, आणि अगागाने म्हटले खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे.
33तेव्हा शमुवेल म्हणाला, “जसे तुझ्या तलवारीने स्त्रियांना बालकांविरहित केले आहे, तशी बायकांमध्ये तुझी आई बालकाविरहित होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वराच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले.
34त्यानंतर शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला.
35शमुवेल आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला आणखी गेला नाही; तरी शमुवेलाने शौलासाठी शोक केला; आपण शौलाला इस्राएलांवर राजा केले म्हणून परमेश्वर अनुतापला.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.