इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 शमुवेल 14

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1एके दिवशी असे झाले की, शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला, “चल आपण पलिष्ट्यांचे ठाणे जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ.” परंतु त्याने आपल्या बापाला हे सांगितले नाही.
2शौल गिब्याच्या शेवटल्या भागी मिग्रोनांत डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता त्याच्याजवळचे लोक सुमारे सहाशे होते;
3एलीचा मुलगा फिनहास याचा मुलगा ईखाबोद याचा भाऊ अहीटूब याचा मुलगा अहीया शिलोत एफोद घातलेला परमेश्वराचा याजक हाही होता. तेव्हा योनाथान गेला हे लोकांस माहित नव्हते.
4योनाथान ज्या घाटांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यावर जाण्यास पाहत होता त्याच्या एका बाजूला खडकाळ शिखर व दुसऱ्या बाजूला खडकाळ शिखर होते; त्यातल्या एकाचे नांव बोसेस व दुसऱ्याचे नांव सेने असे होते.
5एक शिखर उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरे दक्षिणेकडे गिब्यासमोर उभे होते.
6योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंत्यांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आमच्यासाठी कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी सोडायला परमेश्वरास काही अडचण नाही.”
7त्याचा शस्त्रवाहक त्यास म्हणाला, “जे तुझ्या मनात आहे ते सगळे कर. तू पुढे जा, पाहा तुझ्या आज्ञा पालन करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.”
8तेव्हा योनाथान म्हणाला, “पाहा आपण त्या मनुष्याकडे जाऊन त्यास प्रगट होऊ.
9जर ते आम्हास म्हणतील, ‘आम्ही तुम्हाकडे येऊ तोपर्यंत थांबा,’ तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहू वर त्याच्याकडे जाणार नाही;
10परंतु जर ते म्हणतील की, ‘वर आम्हाकडे या,’ तर आम्ही वर जाऊ; कारण परमेश्वराने त्यांना आमच्या हाती दिले आहे. हेच आम्हांला चिन्ह होईल.”
11मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील मनुष्यांना प्रगट केले. पलिष्ट्यांनी म्हटले, “पाहा ज्या गुहांमध्ये इब्री लपले होते त्यातून ते निघून येत आहेत.”
12ठाण्याच्या मनुष्यांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले, “वर आम्हाकडे या म्हणजे आम्ही तुम्हास काही गोष्टी दाखवू.” तेव्हा योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागे वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.”
13मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्या मागोमाग चढून गेला. तेव्हा योनाथानासमोर पलिष्टी पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला.
14जो पहिला वध योनाथानाने केला त्यामध्ये एक बिघा भूमीवर सुमारे वीस माणसे पडली.
15छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला, ते ठाणे व छापे मारणारेही कापले व भूमी कापली. तेथे तर फार घबराट पसरली होती.
16तेव्हा बन्यामिनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्टी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे पळत आहेत.
17मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा.” मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते.
18शौलाने अहीयाला म्हटले, “देवाचा कोश इकडे आण.” कारण त्या वेळी देवाचा कोश इस्राएल लोकांच्यामध्ये होता.
19असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीतला गलबला वाढत वाढत मोठा झाला. तेव्हा शौलाने याजकाला म्हटले, “आपला हात काढून घे.”
20तेव्हा शौल व त्याच्याजवळ ते सर्व लोक जमून लढाईला गेले. आणि पाहा प्रत्येक पलिष्टी मनुष्याची तलवार आपल्या सोबत्याच्या विरूद्ध झाली म्हणून फार मोठी दाणादाण उडाली.
21तेव्हा जे इब्री पूर्वी पलिष्ट्याच्यामध्ये राहिले होते जे चहूकडून त्याच्याबरोबर छावणीत गेले होते तेही शौल व योनाथान याच्याबरोबर जे इस्राएल होते त्याच्याशी मिळाले.
22जी इस्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली.
23असे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलास सोडवले आणि लढाई बेथ-आवेनाकडे गेली.
24त्या दिवशी इस्राएली पुरुष निराश झाले कारण शौलाने लोकांस शपथ घालून सांगितले होते, संध्याकाळपर्यंत मी आपल्या शत्रूचा सूड घेईपर्यंत जो पुरुष काही खाईल त्यास शाप लागो. म्हणून लोकांतल्या कोणी काही खाल्ले नाही.
25देशातले सर्व लोक वनांत आले आणि भूमीवर मध होता;
26वनांत लोक आले तेव्हा पाहा मधाचा ओघ वाहत होता. परंतु कोणी आपला हात आपल्या तोंडाला लावला नाही कारण लोक शपथेला भीत होते.
27परंतु जेव्हा त्याच्या वडिलाने लोकांस शपथ घातली तेव्हा योनाथानाने ती ऐकली नव्हती म्हणून त्याने आपल्या हाती जी काठी होती तिचे टोक पुढे करून मधाच्या मोहळात घालून आपल्या तोंडास लावले; मग त्याचे डोळे टवटवीत झाले.
28तेव्हा लोकांतील एकाने उत्तर करून म्हटले, “तुझ्या वडिलाने लोकांस शपथ घालून निक्षून सांगितले की, जो कोणी आज काही अन्न् खाईल त्यास शाप लागो.” लोक तर थकले होते.
29तेव्हा योनाथान म्हणाला, “माझ्या वडिलाने देशास दुखीत करून सोडला आहे. मी हा थोडा मध चाखला आणि पाहा माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत?
30जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणे खाल्ले असते तर कितीतरी बरे होते! कारण आता पलिष्टांचा आधिक मोठा घात झाला नसता काय?”
31त्या दिवशी ते मिखमाशापासून अयालोनापर्यंत पलिष्ट्यांना मारीत गेले. मग लोक फार थकलेले होते.
32तेव्हा लोक लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, गुरे व वासरे घेऊन भूमीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.
33तेव्हा कोणी शौलास सांगितले की, “पाहा लोक रक्तासह मांस खाऊन परमेश्वराच्या विरूद्ध पाप करत आहेत.” त्याने म्हटले, “तुम्ही अविश्वासूपणे कृत्ये करत आहात. मोठा दगड लोटून येथे माझ्याकडे आणा.”
34शौलाने म्हटले, “लोकांमध्ये धावत जाऊन त्यांना सांगा की, प्रत्येक मनुष्याने आपला बैल व प्रत्येक मनुष्याने आपली मेंढरे माझ्याकडे आणून येथे कापावी मग खावे; रक्तासह खाऊन परमेश्वराविरूद्ध पाप करू नका.” तेव्हा सर्व लोकांनी प्रत्येक मनुष्याने आपापले बैल आपल्या हाताने त्या रात्री आणून तेथे कापले.
35मग शौलाने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी वेदी बांधली, जी पहिली वेदी त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी बांधली ती हीच होती.
36मग शौल बोलला, “आपण रात्री पलिष्ट्यांच्यामागे खाली जाऊन उद्या उजाडेपर्यंत त्याच्यांतली लूट घेऊ आणि आपण त्यांच्यातील एकही पुरुष राहू देऊ नये.” ते म्हणाले, “जे तुला बरे वाटेल ते कर.” मग याजकाने म्हटले आपण येथे परमेश्वराजवळ येऊ.
37मग शौलाने देवाला विचारले, “मी पलिष्ट्यांच्या मागे खाली जाऊ काय? तू त्यांना इस्राएलांच्या हाती देशील काय?” परंतु त्या दिवशीं देवाने काही उत्तर दिले नाही.
38मग शौल म्हणाला, “अहो लोकांच्या सर्व पुढाऱ्यांनो इकडे या आणि हे पाप कशाने घडले आहे ते शोध करून पाहा.
39कारण परमेश्वर जो इस्राएलाचे रक्षण करतो तो जिवंत आहे. म्हणून हे पाप माझा मुलगा योनाथान याने जरी केले, तरी तो खचित मरेल.” पण सर्व लोकांतील कोणीही त्यास उत्तर दिले नाही.
40मग त्याने सर्व इस्राएलांस म्हटले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होऊ.” लोक तर शौलाला म्हणाले, “तुला बरे वाटेल ते कर.”
41मग शौल परमेश्वर इस्राएलाचा देव, यास म्हणाला, “खरे ते दाखीव.” तेव्हा योनाथान व शौल धरले गेले आणि लोक सुटले.
42मग शौलाने म्हटले, “माझ्यामध्ये व योनाथान माझा मुलगा याच्यामध्ये पण चिठ्ठ्या टाका.” तेव्हा योनाथान धरला गेला.
43मग शौल योनाथानाला म्हणाला, “तू काय केले आहेस ते सांग.” योनाथान त्यास म्हणाला, “मी आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने थोडा मध चाखला खरा, आणि पाहा मला मरण पावले पाहिजे.”
44तेव्हा शौल म्हणाला, “परमेश्वर तसे व त्यापेक्षा अधिकही करो; योनाथाना तुला तर खचित मरण पावले पाहिजे.”
45मग लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचे हे मोठे तारण केले तो योनाथान मरावा काय? ते तर दूरच असो! परमेश्वर जिवंत आहे. याच्या डोक्याचा एक केसही भूमीवर पडणार नाही. कारण याने परमेश्वराच्याबरोबर काम केले आहे.” या प्रकारे लोकांनी योनाथानाला सोडवले म्हणून तो मेला नाही.
46मग शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून वर गेला; पलिष्टीही आपल्या ठिकाणी गेले.
47शौलाने तर इस्राएलावर राज्य करण्याचे हाती घेतले; त्याने चहूकडे आपल्या सर्व शत्रूशी म्हणजे मवाबी यांच्याशी व अम्मोनाच्या संतानाशी व अदोमी यांच्याशी व सोबाच्या राजांशी व पलिष्ट्यांशी लढाई केली आणि जेथे कोठे तो गेला तेथे त्याने त्यांना त्रासून सोडले.
48त्याने पराक्रम करून अमालेकाला मार दिला आणि इस्राएलांना त्यांच्या लुटणाऱ्यांच्या हातातून सोडवले.
49योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे शौलाचे पुत्र होते, आणि त्याच्या दोघी मुलींची नांवे, प्रथम जन्मलेली, मेरब आणि धाकटीचे नांव मीखल, ही होती.
50शौलाच्या पत्नीचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती. शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.
51शौलाचा बाप कीश; अबनेराचा बाप नेर हा अबीएलाचा मुलगा होता.
52शौलाच्या सर्व दिवसात पलिष्ट्यांशी जबर लढाई चालू होती. शौल कोणी बलवान किंवा कोणी शूर मनुष्य पाही, तेव्हा तो त्यास आपल्याजवळ ठेवून घेई.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.