इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

जखऱ्या 10

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील, मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील.
2कारण तेराफिम मुर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत, दैवज्ञांनी लबाडीचा दृष्टांत पाहिला आहे; ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात; म्हणून लोक मेंढरांसारखे भटकत आहेत आणि त्यांचा कोणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत.
3परमेश्वर म्हणतो, “माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे; त्यांच्यातील बोकडांना, पुढाऱ्यांना मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची, काळजी वाहील, आणि त्याच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल.”
4“त्यांच्यातूनच कोनशिला उत्पन्न होईल; त्यांच्यापासूनच खुंट्या तयार होतील; त्यांच्यातूनच युध्दात वापरावयाची धनुष्यही येईल; त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल.
5ते आपल्या शत्रूचा पराभव, जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे, तसा तुडवीत करतील; परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानीत करतील.”
6“मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल.
7एखाद्या योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल; त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदीत होतील. परमेश्वराच्याठायी त्यांचे हृदय आनंदीत होईल.”
8“मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन कारण मी त्यांना वाचवीन आणि त्यांची संख्या पूर्वी होती तशीच असंख्य होईल.
9होय! मी माझ्या लोकांस राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आहे, पण त्या दूरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील.
10मी त्यांना मिसरमधून परत आणीन व अश्शूरमधून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना गिलादाच्या व लबानोनाच्या नगरात आणीन. ते त्या जागेत मावणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना आणीन.”
11ते जाचजुलूमाच्या समुद्रातून जातील; ते गर्जनाऱ्या समुद्राला दबकावतील, ते नाईल नदीला सुकवतील व तिचे सर्व तळ उघडे पाडतील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसराच्या सत्तेचा राजदंड त्यांच्यापासून काढून घेतला जाईल.
12मी त्यांना सामर्थ्यवान करीन, ते देवासाठी व त्याच्या नावासाठी चालतील, हे परमेश्वराचे वचन होय.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.