इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

रोमकरांस पत्र 9

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे
2की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे.
3कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन.
4ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत.
5पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन.
6पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत,
7आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही; तर ‘इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल’ असे वचन आहे;
8म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत.
9कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’
10आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी,
11आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्‍याच्या इच्छेप्रमाणे,
12तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’
13कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’
14मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो.
15कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’
16तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे.
17म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, ‘मी तुला ह्यासाठी मोठे केले की, तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजविले जावे.’
18म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो.
19तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे?
20पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्‍याला म्हणू शकेल?
21कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय?
22मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले,
23आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
24त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत.
25कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, ‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन.
26आणि असे होईल की त्यांना ज्याठिकाणी, तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हणले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल.’
27यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल.
28कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’
29आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो.
30मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे.
31पण जे इस्राएल नीतिमत्त्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत.
32आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले.
33कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.