इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

स्तोत्रसंहिता 77

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल.
2माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले. मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.
3मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो; मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो.
4तू माझे डोळे उघडे ठेवतोस; मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.
5मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे याबद्दल मी विचार करतो.
6रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते. मी काळजीपूर्वक विचार करतो आणि काय घडले हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
7प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय? तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का?
8त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का? त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का?
9देव दया करण्याचे विसरला का? त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का?
10मी म्हणालो, हे माझे दुःख आहे, आमच्या प्रती परात्पराचा उजवा हात बदलला आहे
11पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन; मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.
12मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन, आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
13हे देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.
14अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस. तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.
15याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना, आपल्या लोकांस आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस.
16हे देवा, जलाने तुला पाहिले, जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल जले कंपित झाली.
17मेघांनी पाणी खाली ओतले; आभाळ गडगडाटले; तुझे बाणही चमकू लागले.
18तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली; विजांनी जग प्रकाशमय केले; पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली.
19समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाहीत.
20मोशे आणि अहरोन याच्या हाताने तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.