इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

स्तोत्रसंहिता 7

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव.
2नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील.
3परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही.
4माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही.
5जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो.
6हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने.
7राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे.
8परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, परमेश्वरा, मला समर्थन दे, आणि माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्त्विकतेप्रमाणे माझा न्याय कर.
9दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे.
10जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.
11देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो.
12जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.
13त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. तो आपले अग्नीबान तयार करतो.
14त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात.
15त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला.
16त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.
17मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.