इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

स्तोत्रसंहिता 59

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडीव; जे माझ्याविरूद्ध उठतात त्यांच्यापासून मला दूर उंचावर ठेव.
2दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सुरक्षित ठेव, आणि रक्तपाती मनुष्यापासून मला वाचव.
3कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत. हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता, सामर्थी लोक माझ्याविरूद्ध एकत्र गोळा झाले आहेत.
4जरी मी निर्दोष असलो तरी ते माझ्याकडे धावण्याची तयारी करत आहेत; मला मदत करावी म्हणून जागा हो व पाहा.
5हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा, ऊठ आणि सर्व राष्ट्रांना शिक्षा कर; कोणत्याही दुष्ट पापी मनुष्यास दया दाखवू नकोस.
6संध्याकाळी ते परत येतात, कुत्र्यांसारखे गुरगुरतात आणि नगराभोवती फिरतात.
7पाहा, ते आपल्या मुखावाटे ढेकर देतात; त्यांच्या तोंडचे शब्द तलवार आहेत. कारण ते म्हणतात, आमचे कोण ऐकतो?
8परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील; तू सर्व राष्ट्रांना उपहासात धरशील.
9हे माझ्या सामर्थ्या, मी तुझ्याकडे लक्ष देईन; कारण देवच माझा उंच बुरूज आहे.
10माझा देव मला त्याच्या कराराच्या विश्वसनीयतेने भेटेल; माझ्या शत्रूवर माझी इच्छा पूर्ण झालेली देव मला पाहू देईल.
11त्यांना जिवे मारू नको नाहीतर माझे लोक विसरून जातील; हे प्रभू तू आमची ढाल आहेस, आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांस खाली पाड.
12कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द, आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप आणि खोटेपणा यामुळे ते आपल्या अंहकारात पकडले जातात.
13क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर. देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत राज्य करतो हे त्यांना माहित होवो.
14संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरतात. आणि रात्री नगराभोवती फिरतात.
15ते अन्नासाठी वर आणि खाली भटकतात, आणि जर त्यांची तृप्ति झाली नाही तर रात्रभर वाट पाहतात.
16परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस.
17हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन; कारण देव माझा उंच बुरूज आहे, माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.