इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

स्तोत्रसंहिता 107

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
2परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे,
3त्याने त्यांना परक्या देशातून पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशातून एकवट केले आहे.
4ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले; आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही.
5ते खूप भुकेले आणि तान्हेले होते; आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले.
6नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले.
7त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी
8अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत.
9कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
10काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता; काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत.
11त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले, आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले.
12त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले; ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता.
13तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले.
14देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली.
15परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
16कारण त्याने पितळेची दारे तोडली, आणि लोखंडाचे गज तोडून टाकले.
17आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते, आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते.
18सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले.
19तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले.
20त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
21परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
22ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत, आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत.
23काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, आणि महासागरापार व्यवसाय करतात.
24ते परमेश्वराची कृत्ये पाहतात, आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात.
25कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो.
26लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते.
27ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
28तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.
29तो वादळ शांत करतो, आणि लाटांना स्तब्ध करतो.
30समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात, तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो.
31परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
32लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.
33तो नद्यांना रान करतो, पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो,
34आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.
35तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो, आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.
36तेथे भुकेल्यास वसवतो, आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो.
37ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात, आणि विपुल पिके काढतात.
38तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते, तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही.
39नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे ते कमी होतात आणि नष्ट होतात.
40तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो, आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो.
41पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो, आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो.
42सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात, आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात.
43जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृतीवर मनन करावे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.