इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

स्तोत्रसंहिता 105

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या.
2त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला;
3त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो.
4परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या.
5त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
6तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो,
7तो परमेश्वर आपला देव आहे. त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत.
8तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो.
9त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली.
10ही त्याने याकोबासाठी नियम, आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला.
11तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुझा वतनभाग असा म्हणून देईन.”
12हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, होय फार थोडे, आणि देशात परके होते.
13ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले.
14त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली.
15तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका, आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका.
16त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला.
17त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; योसेफ गुलाम म्हणून विकला गेला.
18त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या.
19त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले.
20तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले.
21त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले,
22अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे.
23नंतर इस्राएल मिसरात आले, आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला.
24देवाने आपले लोक फारच वाढवले, आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले.
25आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले.
26त्याने आपला सेवक मोशे आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले.
27त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली.
28त्याने त्या देशात काळोख केला, पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही.
29त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले आणि त्यांचे मासे मरण पावले.
30त्यांचा देश बेडकांनी भरून गेला, त्यांच्या अधिपतींच्या खोलीत देखील बेडूक होते.
31तो बोलला, आणि गोमाशा व उवा त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या.
32त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला.
33त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला. त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली.
34तो बोलला आणि टोळ आले. असंख्य नाकतोडे आले.
35टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले;
36त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले, त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले.
37त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले; त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही.
38ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला, कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती.
39त्याने आच्छादनासाठी ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला.
40इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले, आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले.
41त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले.
42कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची, आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती.
43त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले.
44त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले; त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या.
45ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम आणि आपले नियमशास्त्र पाळावे. परमेश्वराची स्तुती करा.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.