इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

स्तोत्रसंहिता 10

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस?
2कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो.
3कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो.
4दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही.
5त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो.
6तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही.
7त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. त्यांची जीभ जखमी व नाश करते.
8तो गावाजवळ टपून बसतो, गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; त्याचे डोळे लाचारावर टपून असतात.
9जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो.
10त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात.
11तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.
12हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस.
13दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो?
14तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे.
15दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही.
16परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत.
17हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे.
18पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.