इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

नीतिसूत्रे 29

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो, तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही.
2जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात, पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात.
3ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो, पण जो कोणी वेश्येशी सोबत करतो तर तो आपल्या संपत्तीचा नाश करतो.
4राजा न्यायाने देश दृढ करतो, पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो.
5जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो, तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो.
6दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो, पण नीतिमान गाणे गाऊन आनंदित होतो.
7नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते.
8थट्टा करणारे शहराला पेटवतात; पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात.
9जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर, मुर्ख रागावला किंवा हसला तरी काही स्वस्थता नसते.
10रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात.
11मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो, पण शहाणा मनुष्य तो आवरून धरतो आणि शांत राहतो.
12जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात.
13गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे; परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दृष्टी देतो.
14जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला, तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल.
15छडी आणि सुबोध ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.
16जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात; पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते.
17आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल आणि तो तुझा जीव आनंदित करील.
18जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो.
19दास शब्दाने सुधारत नाही, कारण जरी त्यास समजले तरी तो प्रतिसाद देणार नाही.
20कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय? तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे.
21जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल.
22रागावलेला मनुष्य संकटे आणतो; आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात.
23गर्व मनुष्यास खाली आणतो, पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो.
24जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो स्वतःचाच शत्रू आहे; ते शपथेखाली ठेवले जातात आणि ते काहीच बोलू शकत नाही.
25मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो.
26पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात, पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो.
27अप्रामाणीक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो; आणि सरळमार्गी मनुष्याचा दुष्टाला वीट येतो.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.