इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

नीतिसूत्रे 24

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1दुर्जनांचा मत्सर करू नकोस, आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस.
2कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात.
3सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते.
4ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात.
5शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे.
6कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो; आणि पुष्कळ सल्लागारबरोबर असल्याने विजय मिळतो.
7मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे; वेशीत तो आपले तोंड उघडतो.
8जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो, लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात.
9मूर्खाची योजना पाप असते, निंदकाचा मनुष्यांना तिटकारा येतो.
10जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर, मग तुझी शक्ती थोडीच आहे.
11ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर.
12जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.” तर तू काय म्हणतो हे जो कोणी हृदये तोलून पाहतो त्यास हे समजणार नाही का? आणि जो कोणी तुझ्या जिवाचे रक्षण करतो त्यास माहित नाही का? आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही कां?
13माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे.
14त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे; जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे, आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही.
15अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको!
16कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.
17तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको.
18उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल.
19जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको, आणि दुष्टांचा मत्सर करू नको.
20कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही दुष्टांचा दिप मालवला जाईल.
21माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस.
22कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल, आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे?
23हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही.
24जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस; तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.
25पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल.
26जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो.
27तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध.
28निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको, आणि आपल्या वाणीने फसवू नको.
29“त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन. मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको.
30मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो.
31तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती, त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती, आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती.
32मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.
33“थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.”
34आणि दारिद्र्य लुटारूसारखे, आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.