इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

नीतिसूत्रे 20

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; पिण्याने झिंगणारा शहाणा नाही.
2राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो.
3जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो.
4आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही.
5मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो.
6बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते.
7जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो, आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात.
8जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो.
9मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल?
10भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे.
11तरुणसुध्दा आपल्या कृतीने आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो.
12ऐकणारे कान आणि बघणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत.
13झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल.
14विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो.
15तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत.
16जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, जेव्हा तो परक्यास जामीन झाला आहे म्हणून त्यास तारणादाखल ठेव.
17कपटाची भाकर गोड लागते, पण त्यानंतर त्याचे तोंड सर्व वाळूंनी भरेल.
18सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात, म्हणून केवळ ज्ञानाच्या मार्गदर्शनाने लढाई चालू कर.
19लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो, म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस.
20जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल.
21सुरवातीला उतावळीने मिळवलेल्या संपत्तीचा शेवट आशीर्वादित होणार नाही.
22मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस, परमेश्वराची वाट पाहा आणि तो तुझे रक्षण करील.
23असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे आणि अप्रामाणिक तराजू चांगले नाही.
24मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल?
25हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय.
26सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो, आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो.
27मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय, तो त्याच्या अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध घेतो.
28कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात, तो प्रेमाने राजासन बळकट करतो.
29तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे. आणि पिकलेले केस वृद्धाचे सौंदर्य आहे.
30जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.