इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

फिलिप्पैकरांस पत्र 3

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हास पुन्हा लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षितपणाचे आहे.
2त्या कुत्र्यांपासून सावध राहा. वाईट काम करणार्‍यांपासून सावध राहा. केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा.
3कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.
4तरी देहावरही भरंवसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरंवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार.
5मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री, नियमशास्त्रदृष्टीने परूशी;
6आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.
7तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे.
8इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.
9आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व असे असावे.
10हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी ओळख करून घ्यावी.
11म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.
12मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे.
13बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानीत नाही पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून,
14ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.
15तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तेही तुम्हास प्रकट करील.
16तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.
17बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या.
18कारण मी तुम्हास, पुष्कळ वेळा, सांगितले आणि आता रडत सांगतो की, पुष्कळजण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.
19नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.
20आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत.
21ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.