इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

फिलिप्पैकरांस पत्र 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1पौल व तीमथ्य, ख्रिस्त येशूचे दास ह्यांच्याकडून; फिलिपै शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम;
2देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
3मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो.
4माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो;
5पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो.
6आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे.
7आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमानासंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे, मी आपल्या अंतःकरणात, तुम्हास बाळगून आहे.
8देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे,
9मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,
10यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.
11आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे.
12माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून शुभवर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे.
13म्हणजे कैसराच्या हुजुरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जणांत, त्यामुळे माझे बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले;
14आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत.
15कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत.
16मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात.
17पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात.
18ह्यापासून काय झाले? निमित्ताने असो किंवा खरेपणाने, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो व करणारच.
19कारण मी जाणतो की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल.
20कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
21कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.
22पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही.
23कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे;
24तरीही, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे.
25मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे.
26हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे.
27सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
28आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे.
29कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
30मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता, तेच तुम्हीही करीत आहात.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.