इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

गणना 33

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत.
2परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या.
3पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले.
4मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.
5इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले.
6ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले.
7त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले.
8मग लोकांनी पीहहीरोथहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला.
9लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे बारा पाण्याचे झरे होते आणि सत्तर खजुराची झाडे होती.
10लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले.
11त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला.
12सीन रान सोडून ते दफका येथे तळ दिला.
13लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.
14लोकांनी आलूश सोडले व रफीदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.
15लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला.
16त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.
17किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले.
18हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला.
19रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.
20रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.
21लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला.
22रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला.
23लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले.
24शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.
25लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.
26मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.
27लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले.
28तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला.
29लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला.
30हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.
31त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानाला तळ दिला.
32बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले.
33होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले.
34याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.
35अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.
36लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला.
37लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.
38याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता.
39अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता.
40कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अराद येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले.
41लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला.
42त्यांनी सलमोना सोडले व ते पूनोनला आले.
43पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला.
44लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.
45मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.
46लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले.
47अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला.
48लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.
49त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यंत होते.
50आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देनेपाशी यरीहोजवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
51इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल.
52तिथे जे लोक तुम्हास आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
53तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा देश तुम्हास वतन करून दिला आहे.
54तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल.
55परंतु तुम्ही आपणापुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर घालवले नाही जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुम्हास डोळ्यातील कुसळासारखे तुमच्या कुशीत काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.
56मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हास दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.