इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

गणना 26

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
2“इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”
3तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले यरीहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले, ते म्हणाले,
4मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा.
5रऊबेन हा इस्राएलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे: हनोखाचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
6हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
7रऊबेनाच्या वंशातील ही कुळे. त्यामध्ये एकूण त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.
8पल्लूचा मुलगा अलीयाब.
9अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.
10त्यावेळी ती अडीचशे माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले.
11परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत.
12शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेः नमुवेलाचे नमुवेली कूळ, यामीनाचे यामीनी कूळ, याकीनाचे याकीनी कूळ,
13जेरहाचे जेरही कूळ, शौलाचे शौली कूळ.
14ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.
15गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः सफोनाचे सफोनी कूळ, हग्गीचे हग्गी कूळ, शूनीचे शूनी कूळ,
16आजनीचे आजनी कूळ, एरीचे एरी कूळ,
17अरोदाचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
18गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.
19जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.
20यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ
21पेरेसाच्या कुळातील ही कुळेः हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, हामूलाचे हामूली कूळ.
22ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.
23इस्साखाराच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
24याशूबाचे याशूबी कूळ, शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.
25इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.
26जबुलूनाच्या कुळातील कुळेः सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
27जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.
28योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
29मनश्शेच्या कुळातील कुळेः माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ.
30गिलादाची कूळे होतीः इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकाचे हेलेकी कूळ.
31अस्रियेलाचे अस्रियेली कूळ, शेखेमाचे शेखेमी कूळ.
32शमीदचे शमीदाई कूळ, हेफेराचे हेफेरी कूळ.
33हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
34ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.
35एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
36एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.
37ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.
38बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः बेलाचे बेलाई कूळ, आशबेलाचे आशबेली कूळ, अहीरामाचे अहीरामी कूळ.
39शफूफामाचे शफूफामी कूळ, हुफामाचे हुफामी कूळ.
40बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ.
41ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती.
42दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते.
43शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती.
44आशेराच्या कुळातील कुळे होतीः इम्नाचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ, बरीयाचे बरीयाई कूळ.
45बरीयाच्या कुळातील कुळे होतीः हेबेराचे हेबेरी कूळ, मलकीएलाचे मलकीएली कूळ.
46आशेरला सेरा नावाची मुलगी होती.
47ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.
48नफतालीच्या कुळातील कुळे होतीः यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ.
49येसेराचे येसेरी कूळ, शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ.
50ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती.
51ही इस्राएलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
52परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
53त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे.
54मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल.
55देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा.
56प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्ठ्या टाकशील.
57त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ.
58लेव्याची ही कूळे होतीः लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता.
59अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
60नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
61पण नादाब व अबीहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पीत असताना मरण पावले.
62लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांस वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही.
63मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली.
64खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
65कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.