इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

गणना 22

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1नंतर इस्राएल लोक मवाबामधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरीहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला.
2सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते.
3मवाबाचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता.
4मवाबाचा राजा मिद्यानीं लोकांच्या वडीलांना म्हणाला, बैल जसा शेतातले सगळे गवत खाऊन टाकतो तसेच हे लोक आपला नाश करतील. त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबाचा राजा होता.
5त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात राहत होता. इथेच बलामचे लोक राहत असत. बालाकाचा निरोप हा होता. एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर देशातून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ दिला आहे.
6तर आता ये, मी तुला विनंती करतो, तू या लोकांस माझ्यासाठी शाप दे. कारण ते माझ्यापेक्षा खूप भारी आहेत. कदाचित मी त्यांना मारावयास समर्थ होऊन देशातून घालवून टाकील. कारण मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्यास आशीर्वाद मिळतो. आणि जर एखाद्यास शाप दिलास तर त्यास शाप लागतो.
7मवाबी वडील आणि मिद्यानी वडील बलामाशी बोलावयास गेले. त्याच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामास सांगितले.
8बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हास सांगेन.” मवाबाचे पुढारी त्या रात्री बलामाबरोबर राहिले.
9देव बलामाकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?”
10बलाम देवाला म्हणाला, सिप्पोराचा मुलगा बालाकाने, मवाबाच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे.
11तो निरोप हा, एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर देशामधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून आता तू येऊन माझ्यासाठी त्यांना शाप दे. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.
12पण देव बलामास म्हणाला, त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांस शाप देऊ नको. कारण ते माझे आशीर्वादित लोक आहेत.
13दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकाच्या पुढाऱ्यांना म्हणाला, तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्याबरोबर जाऊ देणार नाही
14त्यामुळे मवाबाचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्यास हे सांगितले. ते म्हणाले, बलामाने आमच्याबरोबर यायला नकार दिला.
15म्हणून बालाकाने बलामाकडे दुसरे पुढारी पाठवले. यावेळी त्याने पहिल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढारी पाठवले. हे पुढारी पहिल्या पुढाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते.
16ते बलामाकडे गेले आणि म्हणाले, बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो, तुझ्या इथे येण्याच्या आड कोठलीही गोष्ट येऊ देवू नको.
17मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशील ते मी करीन परंतु तू ये व माझ्यासाठी या लोकांस शाप दे.
18बलामाने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमीजास्त काहीएक करता येत नाही. बालाकाने माझे घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही.
19तरीपण रात्री तुम्ही येथे राहा आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला कळू शकेल.
20त्या रात्री देव बलामाकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्याबरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.”
21दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबाच्या पुढाऱ्यांबरोबर चालला.
22बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामापुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामास थांबवणार होता.
23बलामाच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामास देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले.
24नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या.
25गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामाचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले.
26नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्यास वळसा घालून जाणे शक्य नव्हते.
27गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या काठीने मारायला सुरुवात केली.
28नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामास म्हणाली, तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.
29बलामने गाढवीला उत्तर दिले, तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.
30पण गाढवी बलामास म्हणाली, बघ मी तुझीच गाढवी आहे. खूप वर्षे तू माझ्यावर बसत आला आहेस. आणि यापूर्वी मी असे काही केले नाही हे तुला माहीत आहे. बलाम म्हणाला, नाही.
31नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला.
32परमेश्वराच्या दूताने बलामास विचारले, तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी
33तुझ्या गाढवीने मला पाहिले आणि ती दूर गेली. असे तीन वेळा घडले. जर गाढवी वळली नसती तर आतापर्यंत मी तुला मारले असते आणि तुझ्या गाढवीला जिवंत राहू दिले असते.
34तेव्हा बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, मी पाप केले आहे. तू रस्त्यात उभा आहेस हे मला माहीत नव्हते. मी जर चूक करीत असेन तर मी घरी परत जाईन.
35तेव्हा परमेश्वराचा दूत बलामास म्हणाला, नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल. म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.
36बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामास भेटायला आर्णोन नदीजवळच्या मवाबाच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते.
37जेव्हा बालाकाने बलामास पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, मी तुला आधीच यायला सांगितले होते. तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नव्हतो काय?
38बलामाने बालाकाला उत्तर दिले, पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेल तेवढेच मी बोलू शकतो.
39नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला.
40बालाकाने काही गुरे व मेंढ्या बली म्हणून मारल्या. त्याने थोडे मांस बलामास दिले आणि थोडे त्याच्याबरोबर असलेल्या पुढाऱ्यांना दिले.
41दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामास घेऊन बामोथ-बआल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.