इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

गणना 19

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
2परमेश्वराने इस्राएल लोकांस जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवलेले नाही अशी एक लाल कालवड घ्या.
3ती याजक एलाजाराला द्यावी. त्याने तिला छावणीबाहेर न्यावे आणि तिथे कोणा एकाने तिला त्याच्यासमोर मारावे.
4नंतर एलाजार, हा याजक थोडे रक्त आपल्या बोटावर घेईल आणि काही रक्त दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे.
5नंतर संपूर्ण कालवड त्याच्यासमोर जाळून, कातडी, मांस रक्त आणि आतडे सर्वकाही जाळले पाहिजे.
6नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी कालवड जळत असलेल्या जाळात फेकाव्या.
7याजकाने स्वत:ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
8ज्या मनुष्याने कालवडीला जाळले असेल त्याने स्वत:ला धुवावे. स्वत:चे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
9नंतर जो मनुष्य शुद्ध असेल तो कालवडीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवावी आणि ती इस्राएल वंशाच्या मंडळीकरता अशुद्धी दूर करण्याच्या पाण्यासाठी ती राखून ठेवावी, ती पापार्पण अशी आहे.
10ज्या मनुष्याने कालवडीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील. हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्याबरोबर जे परदेशी लोक राहत आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे.
11जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील.
12त्याने स्वत:ला तिसऱ्या दिवशी ती राख घेऊन आपणास शुद्ध करावे व नंतर सातव्या दिवशी तो शुद्ध होईल, पण जर तो तिसऱ्या दिवशी आपणास शुद्ध करणार नाहीतर तो सातव्या दिवशी तो शुद्ध होणार नाही.
13जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर मनुष्य अशुद्ध असताना परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या मनुष्यास इस्राएल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध मनुष्यावर खास पाणी शिंपडले नाहीतर तो अशुद्ध राहील.
14जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा मनुष्य त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगळ्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील.
15आणि ज्यावर झाकण बांधले नाही असे प्रत्येक उघडे भांडे अशुद्ध होईल.
16खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. जर ते प्रेत बाहेर उघड्यावर असेल किंवा तो मनुष्य युद्धात मारला गेला असेल तरच हे लागू आहे. आणि जर एखाद्याने मरण पावलेल्या मनुष्याच्या अस्थींना हात लावला तरी तो मनुष्य सात दिवस अशुद्ध होईल.
17त्या अशुद्ध मनुष्यास पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या कालवडीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका.
18शुद्ध मनुष्याने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या मनुष्यांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मरण पावलेल्या मनुष्याच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा.
19नंतर शुद्ध मनुष्याने हे पाणी तिसऱ्या व सातव्या दिवशी अशुद्ध मनुष्याच्या अंगावर शिंपडावे. तो मनुष्य सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल.
20एखादा मनुष्य अशुद्ध झाल्यानंतर पुन्हा शुद्ध झाला नाहीतर त्यास इस्राएल लोकांपासून वेगळे ठेवावे. कारण त्याने परमेश्वराचे पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील.
21तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या मनुष्यावर पाणी शिंपडले त्या मनुष्याने स्वत:चे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कोणत्याही मनुष्याने त्या खास पाण्याला स्वर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
22जर त्या अशुद्ध मनुष्याने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो मनुष्य सुद्धा अशुद्ध होईल. तो मनुष्य संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.