इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

गणना 10

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा.
3सर्व मंडळीला दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र बोलविण्यासाठी याजकाने कर्णे वाजवावे.
4जर याजकाने एकच कर्णा वाजविला तर मग अधिकाऱ्यांनी, इस्राएलांच्या वंशाच्या अधिपतीनी तुझ्याकडे जमावे.
5जेव्हा तू कर्णा मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे पूर्वेकडील छावण्यांनी त्यांचा प्रवासास सुरवात करावी.
6जेव्हा दुसऱ्या वेळी मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे तेव्हा दक्षिणेकडील छावण्यांनी प्रवासास सुरवात करावी; त्यांच्या प्रवासासाठी मोठ्याने फुंकून इशारा द्यावा.
7जेव्हा मंडळीला एकत्र जमावावयाचे असेल तेव्हा कर्णा फुंका, पण मोठ्याने फुंकू नये.
8अहरोनाचे मुले, याजक, यांनीच कर्णे वाजवावीत. हा तुमच्या लोकांस पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम आहे.
9तुम्ही जेव्हा तुमच्या देशात तुम्हावर जुलूम करणाऱ्या शत्रूविरूद्ध लढायला जाता, मग तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. मी, परमेश्वर, तुमचा देव तुमची आठवण करीन आणि तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.
10तसेच तुम्ही आनंदाच्या प्रसंगी, तुमचे दोन्ही नियमीत सण व महिन्याच्या सुरवातीच्या दिवशी तुमची होमार्पणाच्या, शांत्यर्पणाच्या यज्ञांच्या सन्मानासाठी तुम्ही कर्णे वाजवावेत. तुमच्या परमेश्वरास तुमची आठवण करून देण्याची ही एक कृती आहे. हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.
11दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या महिन्यात, महिन्याच्या विसाव्या दिवशी, साक्षपटाच्या निवासमंडपापासून ढग वर घेतला गेला.
12तेव्हा इस्राएल लोक सीनाय रानातून आपल्या प्रवासास निघाले. ढग पारानाच्या रानात थांबला.
13परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हा पहिला प्रवास केला.
14पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीच्या निशाणाखालील त्यांच्या वैयक्तिक सैन्यासह बाहेर निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन यहूदाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
15सुवाराचा मुलगा नथनेल इस्साखार वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
16हेलोनाचा मुलगा अलीयाब जबुलून वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
17गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली.
18त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
19सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
20रगुवेलाचा मुलगा एल्यासाप गाद वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
21कहाथींनी प्रवासास सुरवात केली. ते पवित्रस्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते पुढच्या तळावर जाऊन पोहोचेपर्यंत अगोदरच्या इतरांनी पवित्र निवासमंडप उभा करून तयार ठेवला होता.
22त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
23पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
24गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
25दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
26आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
27एनानाचा मुलगा अहीरा नफताली वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
28ह्याप्रकारे इस्राएल लोकांचे सैन्य त्यांच्या प्रवासास सुरवात करीत.
29मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याच्याशी बोलला. रगुवेल मोशेच्या पत्नीचा पिता होता. मोशे होबेबाशी बोलला व म्हणाला, “परमेश्वराने वर्णन केलेल्या देशात आम्ही जात आहोत. तो देश देण्याचे परमेश्वराने आम्हास वचन दिले आहे. तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुझे चांगले करू. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी चांगले करण्याचे वचन दिले आहे.”
30परंतु होबाबाने उत्तर दिले “मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी माझ्या देशात व माझ्या स्वतःच्या लोकात जाईल.”
31मग मोशेने त्यास उत्तर दिले, “कृपा करून तू आम्हास सोडून जाऊ नको. तुला रानात कसा तळ द्यायचा हे माहित आहे. तू आमचा वाटाड्या हो.
32तू जर आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर जे काही आमचे चांगले करील तेच आम्ही तुझे करू.”
33परमेश्वराच्या पर्वतापासून तीन दिवसाचा प्रवास करीत गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्यासाठी जागा शोधायला तीन दिवसाच्या वाटेवर त्यांच्यापुढे गेला.
34जसा ते प्रवास करत होते तसा परमेश्वराचा ढग दिवसरात्र त्यांच्यावर होता.
35जेव्हा कराराचा कोश प्रवासास निघत तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची पांगापांग कर, जे तुझा द्वेष करतात ते तुझ्यापासून पळून जावोत.”
36जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.