इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

गणना 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपामध्ये परमेश्वर मोशेशी बोलला; परमेश्वर म्हणाला,
2सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.
3वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष सैन्यात जाण्यायोगे इस्राएलात असतील त्या सर्वाची त्यांच्या सैन्याप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.
4प्रत्येक वंशातला एक पुरुष जो आपल्या वडिलांच्या घराण्याचा प्रमुख असेल तो तुम्हास मदत करील.
5तुमच्याबरोबर राहून तुम्हास मदत करणाऱ्यांची नावे हीः रऊबेन वंशातला, शदेयुराचा मुलगा अलीसूर;
6शिमोन वंशातला सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल.
7यहूदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;
8इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;
9जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब.
10योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल.
11बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबीदान.
12दान वंशातला अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर;
13आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल;
14गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;
15नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा.
16हे लोकांतून निवडलेले माणसे होती, त्यांच्या पूर्वजांच्या वंशाचे अधिपती होते. ते इस्राएलाच्या कुळाचे प्रमुख होते.
17ज्यांच्या नावाची नोंद होती त्या मनुष्यांना मोशे व अहरोन ह्यानी आपल्याबरोबर घेतले;
18आणि त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मंडळीस एकत्र जमविले; मग इस्राएलाच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली.
19परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.
20इस्राएलाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्याच्याप्रमाणे करण्यात आली.
21रऊबेनाच्या वंशातले मोजलेले एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.
22शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
23शिमोनाच्या वंशातले मोजलेले एकूण एकोणसाठ हजार तीनशे भरली.
24गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
25गादाच्या वंशातले मोजलेले एकूण पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली.
26यहूदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
27यहूदाच्या वंशातले मोजलेले एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.
28इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
29इस्साखाराच्या वंशातले मोजलेले एकूण चौपन्न हजार चारशे भरली.
30जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली;
31जबुलून वंशातील मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली.
32योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
33एफ्राइमाच्या वंशातले मोजलेले एकूण चाळीस हजार पाचशे भरली.
34मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
35मनश्शेच्या वंशात मोजलेले एकूण बत्तीस हजार दोनशे भरली.
36बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
37बन्यामीन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण पस्तीस हजार चारशे भरली.
38दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
39दानाच्या वंशातले मोजलेले एकूण बासष्ट हजार सातशे भरली.
40आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
41आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.
42नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली.
43नफतालीच्या वंशातील मोजलेले एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली.
44मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यानी ही मोजदाद केली.
45इस्राएली वंशातले वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.
46ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.
47इस्राएल लोकांबरोबर लेव्याची नोद त्यांच्या वडिलांच्या वंशावरून घेतली नव्हती.
48परमेश्वराने मोशेला सांगितले होते की,
49लेवी वंशाच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करु नको.
50लेवी लोकांस सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व वस्तूंवर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू वाहून न्याव्यात. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी.
51जेव्हा निवासमंडप हलवावयाचा असेल तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; कोणी परका जवळ आला तर त्यास जिवे मारावे.
52इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ द्यावेत.
53परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्र निवासमंडपाच्या सभोवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर संकट येणार नाही.
54परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.