इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

नहेम्या 5

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1तेव्हा मनुष्यांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहूदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली.
2त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “मुले व मुलींसहीत आम्ही बरेचजण आहोत. आम्हास खायला मिळावे आणि आम्ही जिवंत रहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”
3काहीजण म्हणत होते “दुष्काळ असताना धान्यासाठी आम्हास आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.”
4काही असे सुद्धा म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावरीला राजाचा कर भरण्यासाठी आम्हास पैसे उसने घ्यावे लागत आहेत.
5आमच्या बांधवाचे व आमचे रक्तमांस एकच आहे आणि त्यांच्या अपत्यांसारखीच आमची अपत्ये आहेत. तरीसुद्धा आम्हांला आमची अपत्ये गुलाम म्हणून विकावी लागत आहेत. काहींना तर आपल्या कन्यांना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय्य आहोत कारण आमची शेती आणि द्राक्षमळे आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.”
6जेव्हा मी त्यांच्या या तक्रारी आणि त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा मला अतिशय संताप आला.
7मग मी यावर विचार करून मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही आपल्या बंधूकडून व्याज घेत आहात” मग मी सर्व लोकांस सभेमध्ये एकत्र बोलावले
8आणि त्यांना मी म्हणालो, “आपले यहूदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!” ते लोक गप्प राहिले आणि त्यांना काही बोलायला जागा उरली नाही.
9मी असेही म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. जी राष्ट्रे आमचे वैरी आहेत त्यांची निंदा टाळण्यासाठी तुम्ही देवाविषयी भय बाळगून चालावे की नाही?
10तसेच मी, माझे सेवक, माझे भाऊ त्यांस पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे.
11त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतूनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना याच दिवशी परत करा. त्यांच्याकडून टक्केवारीने घेतलेले पैसे, धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल जे तुम्ही कर्जाऊ दिलेत ते तुम्ही त्यांना परत करा.”
12मग ते म्हणाले “त्यांच्याकडून घेतलेले सर्वकाही आम्ही परत करू व अधिक काही मागणार नाही. आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार वागू.” मग मी याजकांना बोलावून घेतले आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे मी त्यांना शपथ घ्यावयास लावली.
13मग मी आपला पदर झटकून म्हणालो, “आपले वचन जो पाळणार नाही त्यास देव त्यांना त्यांच्या घरातून आणि मालमत्तेपासून झटकून टाकील. तो मनुष्य सर्वस्वाला मुकेल.” ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.
14शिवाय, यहूद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत मी अधिकारी होतो. मी यहूदाचा बारा वर्षे अधिकारी होतो.
15पण माझ्या आधी सतेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादित व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षरस घेऊन आणखी प्रत्येकी चाळीस शेकेल रुपे घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत. पण मी तसे केले नाही कारण मला देवाचे भय होते.
16मीसुद्धा तटबंदीच्या कामात सतत होतो आणि आम्ही जमीन विकत घेतली नाही. आणि माझे सर्व सेवक काम करण्यासाठी एकत्र आलो.
17माझ्या मेजावर यहूदी आणि अधिकारी यांच्यातले दीडशे माणसे शिवाय आसपासच्या राष्ट्रातून जे आम्हाकडे आले तेही जेवत असत.
18आता प्रत्येक दिवशी एक बैल, सहा निवडक मेंढरे आणि पक्षीही तयार करीत असत, व प्रत्येक दहा दिवसानी सर्व प्रकारचे द्राक्षरस मुबलक प्रमाणात आणत आणि तरीही, मी राज्यपालाकडून अन्नाचा भत्ता मागितला नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा खूप भारी होता.
19हे माझ्या देवा, जे मी या देशाच्या लोकांकरता केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.