इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

नहेम्या 1

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1हखल्याचा पुत्र नहेम्या याची ही वचनेः आता असे झाले की, अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी, शूशन या राजवाड्यात होतो.
2माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहूदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे बंदिवासातून सुटका झालेल्यापैकी जे यहूदी बाकीचे राहिले होते त्यांच्याविषयी आणि यरूशलेमाविषयी मी त्यांची विचारपूस केली.
3त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातून सुटका होऊन प्रांतात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे, कारण यरूशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे आणि तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”
4आणि हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास केला आणि स्वर्गीय देवापुढे प्रार्थना केली.
5मी म्हणालो, हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू महान व भयप्रद देव आहेस. तुझ्यावर प्रीती करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञांचे पालन करणाऱ्या लोकांशी केलेला आपला करार पाळतोस व त्यांजवर करुणा करतोस.
6तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपाकरून डोळे उघडून पाहा आणि कान देऊन ऐक, तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलाच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द जी पापे केली आहेत, ती मी कबुल करतो की, मी व माझ्या वडीलांच्या घराण्याने पाप केले आहे.
7आम्ही तुझ्या विरूद्ध अतिशय वाईट वर्तन केले आहे. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.
8कृपया तुझा सेवक मोशे याला सांगितलेले वचन तू आठव. त्यास तू म्हणाला होतास, “जर तुम्ही अविश्वासू राहिलात तर मी तुम्हास दुसऱ्या राष्ट्रांमध्ये पांगवून टाकीन,
9पण तुम्ही माझ्याकडे परत आलात व माझ्या आज्ञा पाळल्यात आणि तसे कराल तर आकाशाच्या अंतापर्यंत जरी पांगलेले असाल तरी मी त्यांना तेथून एकत्र करीन. माझ्या नावासाठी म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.”
10आता हे तुझे सेवक असून आणि तुझे लोक आहेत, ज्यांना तू आपल्या प्रचंड सामर्थ्याने व आपल्या बलवान हाताने सोडवलेस.
11तेव्हा, हे परमेश्वरा, मी तुला विनवणी करतो की, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आता आज तुझ्या सेवकाला यश दे आणि या मनुष्यावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.